शेतकरी कायद्यासंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी : देवेंद्र फडणवीस
शेतकरी कायदा पास करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. जे कायदे केंद्रात आता मंजूर झाले आहेत ते काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात करण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे . यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकस आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे . तसेच 2010 साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे .
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हा कायदा पास करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. जे कायदे केंद्रात आता मंजूर झाले आहेत ते काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात करण्यात आले होते. केंद्राने आत्ता हे कायदे केल्यानंतर त्याला महाराष्ट्रात विरोध होतोय, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे ही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात एक भूमिका आणि केंद्राच्या कायद्याबाबत वेगळी भूमिका हा आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा असल्याचे ते म्हणाले .
सध्याच्या शेतकरी कायद्या च्या संदर्भात 2019च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक तरतुदी दिसून येत आहेत. पवार केंद्रात मंत्री असताना त्यावेळी टास्क फोर्स तयार करून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बाजारपेठेत हा कायदा लागू करावा अशी विनंती केली होती असेही त्यांनी सांगितले. तत्कालीन पवार यांचे पत्र नीट वाचल्यास याची आघाडीच्या नेत्यांना अनुभूती येईल. देशातील नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे ते या कायद्याचे समर्थन करतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
