Devendra Fadnavis VIDEO: रक्तातील, नात्यातील... ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही: देवेंद्र फडणवीस
Mumbai Maratha Reservation Protest : मराठवाडा हे स्वातंत्र्यापूर्वी निझामाच्या राज्यात असल्याने त्या ठिकाणी जुन्या नोंदी मिळण्यास अडचणी होत्या. त्या ठिकाणी हैदरबाद गॅझेट लागू होणार असं फडणवीस म्हणाले.

मुंबई : मला कितीही शिव्या दिल्या, दोष दिले तरी मी सगळ्या समाजासाठी काम करणार. मराठा उपसमितीने एक चांगला तोडगा काढला आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेतला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आलं. मनोज जरांगे यांनी केलेल्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या. त्यामधील हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली. त्याचा फायदा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना होणार आहे.
हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याची तयारी होती
हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यामध्ये मनोज जरांगेंची मागणी ही सरसकटची होती. त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. न्यायालयाचे निर्णय पाहता ते शक्य नव्हतं. ही गोष्ट आम्ही जरांगेंच्या लक्षात आणून दिली. आपल्या कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं तर ते व्यक्तीला दिलं जातं. त्यामुळे सरसकट आरक्षण देता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही हे सांगितलं. त्याला जरांगे यांनी मान्यता दिली. त्यानंतर उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार केला.
रक्त-नात्यातील लोकांना सर्टिफिकेट मिळणार
राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीतील सर्व प्रमुख नेत्यांचं मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने बसून, अभ्यास करून हा मार्ग काढला आहे. जे मराठवाड्यात राहणारे, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, रक्त-नात्यातील कुणाचाही कुणबी उल्लेख असेल तर त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार. हैदरबाद गॅझेटिअरच्या माध्यमातून, ज्यांना पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळणार.
ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाहीत. त्या ठिकाणी नोंदीचा हा प्रश्न गंभीर होता. त्यावर आम्ही संविधानिक तोडगा काढला. तो कोर्टातही टिकणार आहे असंही ते म्हणाले.
समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण समजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होतं. तो न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना निर्माण होणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात."
Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
- हैदराबाद गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
- गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- सातारा गॅझेटिअरवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल. त्यामध्ये काही त्रुटी आहेत, एका महिन्यात त्या दूर करुन त्याला मान्यता देण्यात येणार आहे.
- मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार.
- शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार.
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार. आठवड्याभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होईल.
ही बातमी वाचा:
























