विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीचं सरकार 'स्थगिती सरकार': देवेंद्र फडणवीस
सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जे अवमान करत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहा पानाला आम्ही जाऊ इच्छित नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडीचं सरकार 'स्थगिती सरकार' आहे. सत्तेत येताच सरकारने विकासकामांना स्थगिती दिली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा शब्द पाळावा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सरकारच्या चहापानावरही विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. सरकारमध्ये मंत्री नाही, निर्णय नाहीत, फक्त स्थगिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जे अवमान करत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जाऊ इच्छित नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीचं सरकार 'स्थगिती सरकार'
महाविकास आघाडीचं सरकार 'स्थगिती सरकार' आहे. सध्या महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. राज्यात सुरु असलेली कामं फेरआढावा घेण्यासाठी थांबवण्यात आली आहेत. ज्या सरकारच्या धोरणांमध्ये सातत्य राहत नाही. राष्ट्रीय पेयजलची कामे ज्याला केंद्राने 8 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. त्याला या सरकारने स्थगिती सरकारने दिली, ती तातडीने सुरु करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जाणीवपूर्वक भविष्यात हात वर करता यावे म्हणून आर्थिक स्थिती चुकीची दर्शवली जात आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अधिवेशनाबाबत हे सरकार गंभीर नाही
सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तीन पक्षांतील विसंवादामुळे खातेवाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे कोणाला प्रश्न विचारायचे, कोण उत्तर देणार, उत्तर देणाऱ्यांकडे ते खातं राहील की नाही, उत्तरदायित्व आहे की नाही? असे प्रश्न निर्माण होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यामुळे नागपूर अधिवेशनाबाबत हे सरकार गंभीर नाही, केवळ अधिवेशनाचा फार्स केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही. मुख्यमंत्र्यांनी 25 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती फळबागांना 50 हजार रुपये प्रति हेक्टर भरपाईची मागणी केली होती. किमान त्याची तरी पूर्तता तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. राज्यातील 93 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 23 हजार कोटींच्या मदतीचा शब्द पाळला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. महाविकास आघाडी सरकारने कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे हे कधी माफ होणार याचा कार्यक्रम तरी सरकारने जाहीर करावा. विरोधी पक्ष म्हणून या आमच्या मागण्या नाहीत, तर सध्याच्या सरकारने विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या त्याची आठवण आम्ही करुन देत आहोत, असं फडणवीस म्हणाले.
सत्तेसाठीची लाचारी त्यांना लखलाभ
सत्तेत राहण्यासाठी अजून किती दिवस लाचारी पत्करणार आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला विचारला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा उभा महाराष्ट्र आणि देश निषेध करत आहे. मला आश्चर्य वाटतं की ज्या सावरकरांबद्दल शिवसेनेला अभिमान होता, त्यांना आज कसली सौदेबाजी करावी लागत आहे. सत्तेसाठीची त्यांची लाचारी त्यांना लखलाभ, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.