नारायण राणेंच्या वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण त्यांच्या पाठीशी मात्र भाजप ठाम उभा : देवेंद्र फडणवीस
राणेंच्या विधानाचं समर्थन नाही पण राणेंच्या पाठीशी भाजप खंबीर आहे. एखाद्याने वासरू मारलं तर आम्ही गाय मारू अशा प्रकारे सरकार वागतंय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई : नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले त्यावरुन आज महाराष्ट्राचे वातावरण तापलं असून शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे.
मुख्यमंत्र्यांवर बोलताना संयम राखणं महत्वाचं आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राणेंच्या विधानाचं समर्थन नाही पण राणेंच्या पाठीशी भाजप खंबीर आहे. एखाद्याने वासरू मारलं तर आम्ही गाय मारू अशा प्रकारे सरकार वागतंय. नारायण राणेंना अटक केली तरी भाजपची जनआशीर्वाद यात्रा पूर्ण होणारच."
सरकारला खुश करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरु असून पोलिसांनी कायद्याने काम करावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेकायदेशीर काम करणारे पोलीस आता कुठे आहेत हे मी सांगण्याची गरज नसल्याचा इशारा देंवेंद्र फडणवीसांनी दिला.
शेरजीर उस्मानाी महाराष्ट्रात येतो, देशाला शिव्या देतो, पण त्याच्यावर कारवाई नाही. पण नारायण राणेंच्या प्रकरणात, कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नाही, पण त्याचे गुन्हामध्ये रुपांतर करुन कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाशिकचे आयुक्त स्वत: ला छत्रपती समजतात का असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केला.
नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :