Raigad : रायगडचा विकास कौतुकास्पद, रायगडप्रमाणेच इतर किल्ल्यांचही संवर्धन व्हावं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दुर्गराज रायगडला भेट दिली. यावेळी त्यांनी रायगडवर सुरु असलेल्या विकास कामांचे कौतुक केलं.
रायगड : रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असलेला किल्ल्याचा विकास हा कौतुकास्पद आहे. रायगडच्या विकासाप्रमाणेच इतर किल्ल्यांचाही विकास व्हावा अशी इच्छा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. ते आज रायगड येथे बोलत होते.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या निमंत्रणानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडला भेट दिली. तब्बल चार तास राष्ट्रपती रायगडावर होते. या दरम्यान त्यांनी होळीचा माळ, राजसदर, जगदीश्वराचे मंदिर, छत्रपतींची समाधी आणि रायगड संवर्धनाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. किल्ले रायगडावरील राजसदरात असलेल्या राज सिंहासनाधिष्ठित महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रपतींनी अभिवादन केले. तसेच अतिशय आत्मीयतेने सर्व इतिहास जाणून घेतला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रोप वेने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर राजसदरेवरच्या सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.
या दरम्यान त्यांनी जे भाषण केले, त्यात रायगडाप्रमाणेच इतर किल्ल्यांची देखील संवर्धन आणि जतन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच रायगड प्राधिकरण करत असलेल्या कामाचे कौतुक केले. रायगड प्राधिकरणामार्फत राष्ट्रपतींना चांदीची तलवार, महाराजांच्या काळातील सोन्याचे होन, महाराजांच्या काळातील कमरेला बांधायचा पट्टा आणि आज्ञापत्र भेट म्हणून देण्यात आले. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपतींच्या संग्रहालयात जतन करून ठेवणार असल्याचे राष्ट्रपतींनी संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले.
राष्ट्रपतींना आराम करण्यासाठी एक खास राजवाडा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केला होता. त्या राजवाड्याचेदेखील राष्ट्रपतींनी भरभरून कौतुक केले. तसेच ढोल वाजावणाऱ्या एका लहान मुलीकडे जाऊन ढोल कसा वाजवतात हे राष्ट्रपतींनी जाणून घेतले.
आजपर्यंत ग्यानी झेलसिंग हेच एकमेव राष्ट्रपती किल्ले रायगडावर आले होते. तसेच पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी देखील किल्ले रायगडावर येऊन गेले होते. त्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील रायगडावर होत्या. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती गडउतार झाले आणि पुन्हा हेलिकॉप्टर मध्ये बसून दिल्लीकडे रवाना झाले.
संबंधित बातम्या :
- PHOTO : दुर्गराज रायगडला राष्ट्रपतींची भेट; 'भवानी तलवार' आणि 'शिवराई होन'ची प्रतिकृती भेट
Raigad : शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेलं 'शिवराई होन' म्हणजे नेमकं काय? - Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा....रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल