उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार
कार्तिकी यात्रेतही आषाढीप्रमाणे पंढपुरात संचारबंदी लागू होणार आहे. सोबतचं 4 दिवस एसटी बस सेवा बंद राहणार आहे.
![उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार Deputy Chief Minister Ajit Pawar will practice mahapooja to his wife Karthiki Ekadashi उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/15013116/vitthal-temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. निवडणूक आयोगाने नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मान्यता दिली आहे.
कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पंढपूरमध्ये 22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून 26 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.
वारकरी संप्रदाय मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी करीत असला तरी कोरोनाचा वाढत धोका पाहून शासन व प्रशासन यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही सवलत देता येईल का यावर सध्या प्रशासन विचार करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)