(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षणासंदर्भात उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचं असतं हे सरकार ठामपणे तुमच्या सोबत आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आंदोलन न करण्याचं आवाहन या वेळी केलं आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत विरोधकांशी चर्चा आज केली. विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका गोष्टीचं समाधान आहे ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सरकारसोबत आहोत हे वचन दिलं आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व पक्ष वचनबद्ध असून उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर बैठक घेतली.
कायदेशीर बाबी तपासून सरकार पुढचं पाऊल टाकणार आहे. सर्व विधीतज्ज्ञांचं मत विचारात घेऊन पुढचं पाऊल टाकणार आहे. सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत आहे. सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचं असतं हे सरकार ठामपणे तुमच्या सोबत आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचं आवाहन यावेळी केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची यावर चर्चा केली. सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाली असून लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठ कडे जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वजण वचनबद्द आहोत.