देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
Wardha News: या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे वचन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले आहे.
PM Narendra Modi Visit in Wardha : आमच्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापसाची खरेदी हमीभावात व्हावी, त्यांना अधिक दर मिळावा, यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आम्ही केली आहे. त्यांनी शेतकरीहितासाठी तत्काळ निर्णयही घेतलाय. किंबहुना त्याचा परिणामही दिसू लागला आहे. अलिकडे सोयाबीनचे दर वाढले आहेत. तर या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे वचन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले आहे.
आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीररित्या सांगितले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर शुक्रवारी विशेष कार्यक्रम झाला. यात अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली वचनबद्धता स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते.
साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार- देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, वर्ध्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ, तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहचणार आहे. जीवनात परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी निर्माण केली आहे. राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना लक्षात आणून दिले.
बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केवळ पंतप्रधान मोदींनी केला
मायक्रो ओबीसींचे जीवन बदलले आहे. इतक्या वर्षांत आमच्या लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी यांचा यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही. या बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्वांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांचा रोजगार वाढविता यावा म्हणून अर्थसहाय्य दिले. त्यांचे जीवन बदलविले, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या: