Cyclone Asani : असनी चक्रीवादळाचा मच्छीमारीवर परिणाम, कोकणातील वातावरणात बदल, तर सिंधुदुर्गमध्ये पाऊस
असनी चक्रीवादळाचा अनेक ठिकाणी परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. असनी चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकणात झाला नसला तरी समुद्र मात्र खवळलेला आहे. मच्छीमारीवर मोठा परिणाम झाला आहे.
Cyclone Asani News : बंगालच्या उपसागरात निर्णाम झालेल्या असनी चक्रीवादळाचा अनेक ठिकाणी परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसत आहे. दरम्यान, असनी चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकणात झाला नसला तरी समुद्र मात्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. कोकणातील वातावरणात कमालीचा बदल झालेला असून सगळीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री रिमझिम पाऊस पडला आहे.
असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळला असल्याने त्याचा परिणाम मच्छीमारीवर होताना दिसत आहे. समुद्र खवळल्याने मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. त्यामुळे असनी चक्रीवादळाचा मासेमारीवर परीणाम होत आहे. तर कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.असनी चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनार्यालगत अरबी समुद्रावर देखील होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि घाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चक्रीवादळादरम्यान वादळी वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि यनम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. असनी चक्रीवादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. ओडिशातील गंजम जिल्ह्यात 6 बोटी बुडाल्याची घटना घडली. पण वेळीच परतीचा अलर्ट मिळाल्याने जीवितहानी टळली आहे. त्यामुळे 60 मच्छीमार समुद्रातून सुखरुप बाहेर आले.
असनी चक्रीवादळ हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे 330 किमी अंतरावर आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 'असनी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे, त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, हे वादळ काकीनाडा किंवा विशाखापट्टणमजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस राजली या नौदल हवाई स्थानकांवर बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण, तसेच गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. चक्रीवादळाशी सामना देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Cyclone Asani : 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग; IMD कडून इशारा, 'या' भागांसाठी 'रेड अलर्ट'
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील किनाऱ्यावर वाहून आला सोनेरी रंगाचा रथ, सोनेरी रथाचं रहस्य काय?