Mumbai Goa Special Train: गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शुक्रवारी मुंबई-मडगाव विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या सर्व माहिती
Mumbai Madgaon Special Train: मुंबईहून कोकण, गोव्याला जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी 9 जून रोजी विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.
Mumbai Madgaon Special Train: गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस एकेरी धावणार आहे. याचा अर्थ ही एक्स्प्रेस सीएसएमटीहून मडगाव येथे पोहचणार. मात्र, परतीच्या प्रवासाठी ही एक्स्प्रेस नसणार. सुट्टीचा कालावधी लक्षात घेता अनेकांना रेल्वे आरक्षण मिळाले नाही. अशा प्रवाशांसाठी ही ट्रेन दिलासादायक असणार आहे. या ट्रेनसाठीचे आरक्षण सुरू झाले आहे.
किती वाजता सुटणार?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मडगाव एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 01149) दरम्यान शुक्रवारी 9 जून रोजी धावणार आहे. 9 रोजी ही विशेष एक्स्प्रेस मुंबई CSMT येथून 05:30 वाजता सुटणार असून मडगाव जंक्शनला त्याच दिवशी सायंकाळी 5.20 वाजता पोहचणार आहे.
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
ही विशेष एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
किती कोच आहेत?
या एक्स्प्रेसमध्ये एकूण 16 कोच असणार आहेत. यामध्ये एक विस्टाडोम कोच आहे. तर, एसी चेअर कार कोच 3, द्वितीय श्रेणी आसन कोच 10, एसएलआर कोच 1 आणि जनरेटर कार 1 अशी रचना असणार आहे.
'वंदे भारत एक्स्प्रेस' लांबणीवर
मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Vande Bharat Express) शनिवारी, 3 जून होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या (Odisha Railway Accident) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. त्याची तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र, ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
वंदे भारत ट्रेनची वेळ आणि थांबे
मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25 वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.