सिंधुदुर्गात वैयक्तिक वादातून क्रेटा गाडी जाळली, वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल
वैयक्तिक वादातून क्रेटा कार जाळल्याची घटना सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सिंधुदुर्ग : तळकोकणात वेंगुर्ले तालुक्यातील रेडी-नागोळेवाडी येथील शिवानंद नारायण सूर्याजी यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी जाळण्यात आली आहे. गौरेश कांबळी यांनी वैयक्तिक वादातून ही जाळल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसांत शिवानंद यांनी दिली आहे. याप्रकरणी गौरेश कांबळी यांच्यावर वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानंद सूर्याजी यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या तक्रारीत रेडी-नागोळेवाडी येथे शिवानंद राहत असून त्यांचे वडिलोपार्जित किराणा मालाचे दुकान आहे. त्याचठिकाणी गौरेश कांबळी याचे घर आहे. शिवानंद सूर्याजी यांच्या मालकीचे तीन डंपर व्यवसायासाठी भाड्याने लावले आहेत. त्यांच्या घराजवळ चारचाकी गाडी जात नसल्याने घरापासून काही अंतरावर गाडी लावण्यासाठी त्यांनी शेड काढली आहे. रेडी माऊली मंदीर ते जेटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन ट्रान्सपोर्टचे डंपर ये-जा करत असतात. तो रस्ता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या मालकीचा आहे.
परंतु गौरेश कांबळी हा सदरचा रस्ता आपल्या मालकीचा असल्याचे सांगून ट्रान्सपोर्ट फर्ममधील डंपर वाहतूक करणाऱ्यांकडून पैसे मागतो. पैसे नाही दिल्यास मोटरसायकल रस्त्यावर आडवी लावून सर्वांना धमकी देतो. असाच प्रकार त्याने 19 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर रोजी माझ्यासोबत केला. तसेच 21 ऑक्टोबरला संध्याकाळी गौरेश मला रस्त्यावर भेटला त्यावेळी विनाकारण वाद घालत मधे पडू नको, नाहीतर तुझी गाडी जाळून टाकीन अशी धमकी दिली. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसाय फर्ममधील अर्जुन भुते यांच्या मालकीच्या जमिनीतील चारही बाजूने घातलेले सिमेंट पोल त्याने तोडून टाकले, असं शिवानंद सूर्याजी यांनी तक्रारीत म्हटलंय.
शिवानंद यांची क्रेटा गाडी नेहमीप्रमाणे शेडमध्ये लावलेली होती. ती सुस्थितीत होती. 22 ऑक्टोबरला रात्री 2 वाजेच्या दरम्यान लतेश सूर्याजी यांनी शेडमध्ये लावलेली क्रेटा गाडी कुणीतरी जाळली असं शिवानंद यांना सांगितलं. ही घटना गौरेश कांबळी याने आपण त्याला पैसे देत नसल्याच्या रागातून गाडी जाळून नुकसान केले असल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसांत केली आहे. याप्रकरणी गौरेश कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.