(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण
Maharashtra Vidhimandal Assembly Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhimandal Assembly Session : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वेगानं वाढणारे कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. आज बीएमसी कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करणार आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ज्यावेळी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Maharashtra Vidhimandal Session) शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज (सोमवारी) निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.
महाराष्ट्राची चिंता वाढली, ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. राज्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 918 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढे झालंय.
राज्यात आतापर्यंत 6 कोटी 84 लाख 55 हजार 314 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 57 हजार 888 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आलीय. राज्यात सध्या 89 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Booster Dose Rule : कॉकटेल स्वरुपात मिळणार बुस्टर डोस? असा असू शकतो सरकारचा फॉर्म्युला
- मुंबईचं टेन्शन पुन्हा वाढलं; 13 दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ
- Mumbai Corona Update : मुंबईकरांची चिंता वाढली, रविवारी आढळले 922 नवे कोरोना रुग्ण
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा