Coronavirus: महाराष्ट्रात एकाच दिवशी नऊ हजार कोरोना रुग्ण, चार महिन्यानंतर सर्वाधिक संख्या
महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या चार महिन्यानंतर बुधवारी एकाच दिवशी नऊ हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
मुंबई: कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 21 लाख 79 हजार 185 रुग्ण आहेत. तर बुधवारी राज्यात कोरोनामुळे 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या आता 52,280 इतकी झाली.
राज्यात आता कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20 लाख 43 हजार 349 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 82,343 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1,121 रुग्ण समोर आले आहेत तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 3,28,742 इतकी झाली आहे.
मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड लावण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय. कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे.
Covid Vaccination: आतापर्यंत 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस