Coronavirus | बीडमध्ये कोरोनावरून राजकारण? क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन
कोरोना व्हायरसवरून बीडमध्ये राजकराण तापल्याचं बोललं जात आहे. एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या क्षीरसागर कुटुंबियांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
![Coronavirus | बीडमध्ये कोरोनावरून राजकारण? क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन Coronavirus Update beed politics Sandeep Kshirsagar and Jaydatta Kshirsagar are Home Quarantine Coronavirus | बीडमध्ये कोरोनावरून राजकारण? क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/26081402/Sandeep-Kshirsagar_Jaydatta-Kshirsagar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : बीडच्या राजकारणात चांगला दबदबा असलेले क्षीरसागर कुटुंब होम क्वॉरन्टाईन करण्यात आल्याने कोरोनाच्या संदर्भातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. आधी फक्त शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वॉरन्टाईन केले होते. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. अख्खं क्षीरसागर कुटुंबालाच होम क्वॉरन्टाईन होण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. यासंबंधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः फेसबूक पोस्ट लिहून खुलासा केला आहे.
विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी सुरुवातीला जयदत्त क्षीरसागर हे मुंबईवरुन बीडला आले असल्यामुळे त्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने जयदत्त क्षीरसागर यांना तर होम क्वॉरन्टाईन केलेच शिवाय क्षीरसागर कुटुंबच होम क्वॉरन्टाईन केल्याने आता जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबतच संदीप क्षीरसागर याना ही घरातच राहावे लागणार आहे.
संदीप क्षीरसागर यांची फेसबूक पोस्ट
संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जगात थैमान घालत असलेल्या कोरना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एका आठवडा पूर्वीच म्हणजे 14 मार्च 2020 रोजी अधिवेशनाची सांगता केली. त्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे 15 मार्चला मी मतदारसंघात आलो. केंद्र आणि राज्य सरकार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटून मतदार संघातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती घेऊन सूचना केल्या. त्यासोबतच शहरातील स्वच्छतेबाबत व जंतुनाशक फवारणी बाबत शहरातील वेगवेगळ्या भागात भेटी देऊन मुख्याधिकार्यांना सूचना दिल्या. तसेच गोरगरीब कुटुंबांना केंद्र व राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे तात्काळ रेशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पाठपुरावा करत असताना, आज जनतेला माझी मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून खरी गरज असताना जयदत्त क्षीरसागरांच्या अविवेकी वागण्यामुळे मला घरात बसण्याची वेळ आलेली आहे.
संदीप क्षीरसागर यांनी पुढे लिहिलं आहे की, 'आज रोजी जिल्ह्यात एकही कोरना बाधित रुग्ण आढळलेला नसताना चाळीस वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या स्वार्थी कृत्यामुळे माझ्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण मतदारसंघाला एव्हाना जिल्ह्याला अडचणीत आणले आहे. जयदत्त क्षीरसागर व मी एकाच घरात राहत असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी बीड यांनी मला आज पत्राद्वारे होम क्वॉरन्टाईन करण्याच्या सूचना दिल्या.'
'रेशन दुकानांमार्फत वाटण्यात येणारे धान्य गोर गरीब कुटुंबांना व्यवस्थितरीत्या वाटप व्हावे यासाठी माझी खरी गरज मतदारसंघातील जनतेला असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या अविवेकी व स्वार्थी वागण्यामुळे मला घरात बसण्याची वेळ आलेली आहे. परंतु मी बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेला शाश्वत करू इच्छितो की तुमच्या कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी माझा कार्यकर्ता तुमच्या सोबत असेल.', असं संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. संबंधित बातम्या : Coronavirus | सोशल डिस्टन्सिंग पाळत सांगलीतील महिलांनी पोलिसांसाठी 10 हजार कॉटनचे मास्क बनवले!महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)