(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी; तर एकूण कोरोना बाधितांचा आकडा 47 वर
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 47 वर पोहोचला आहे. बुधवारी दिवसभरात एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
सांगली : जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. तर आणखी सहा नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. बुधवारी दिवसभरात एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे सर्वजण मुंबईहून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा एकूण आकडा 47 झाला आहे.
सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. मुंबईहून येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. इन्स्टिट्यूट क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बुधवारी दिवसभरात एकूण दहा नवे कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. सकाळी चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर रात्री उशिरा आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा समोर आला आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील कामत मधील एक 54 वर्षीय महिला जिच्या पतीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी मधील 45 वर्षीय महिला, वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील 34 वर्षीय पुरुष तर ठाणापुडे मधील 21 वर्षीय तरूण, शिराळा तालुक्यातील चिंचोली मधील 43 वर्षीय पुरुष आणि तासगाव तालुक्यातील शिरगाव मधील 62 वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईवरून आले आहेत. त्यांना प्रशासनाकडून क्वॉरंटाईन करण्यात आले होते.आणि या सर्वांचे अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.
पाहा व्हिडीओ : कोविड सेंटर्स उभी राहिली, मात्र वैद्यकीय कर्मचारी कुठेत?
शिराळा तालुक्यातील मोहरे येथील 50 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्य झाला आहे. संबंधित कोरोना बाधितांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती नाजूक स्थितीत होती. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आणि बुधवारी सायंकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे तिसरा बळी गेला आहे. तर बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोना बाधीताचा आकडा 10 ने वाढला. यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 47 वर पोहचली आहे. आतापर्यंत 98 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 48 जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 75 हजार 200 हून अधिक तर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 35 हजार 500 हून अधिक आहे.