Coronavirus | महाराष्ट्र सरकारचं 'प्रोजेक्ट प्लॅटिना', प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात
जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात होत आहे. आजपासून लातूर आणि सोलापुरात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात.
मुंबई : कोरोना व्हायरसवरील उपचार पद्धतीत महत्त्वाची समजली जाणारी आणि जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात सुरु झाली आहे. महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं देशातील पहिलं राज्य आहे. आजपासून सोलापूर आणि लातूरमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता या ट्रायलचं उद्घाटन केलं. सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढीत दोन दात्यांना बोलावून त्यांचा प्लाझ्मा काढून घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यातच मशीन कार्यान्वित झाल्या आहेत.
‘Project PLATINA’-World’s Largest convalescent plasma therapy trial cum treatment of severe COVID 19 patients was today launched by @Maha_MEDD & inaugurated by CM Uddhav Balasaheb Thackeray. pic.twitter.com/wkbRaoaEP6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2020
प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा? कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरांनी अशाप्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करुन रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवलं. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर ठरवतात. मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या आणि नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो. आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. पूर्णपणे बरं झालेल्या रुग्णाने www.plasmayoddha.in या वेबसाईटवर नोंद करावी. प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करुन एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं.
Plasma treatment | सकारात्मक बातमी! भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर होणार
प्लाझ्मा देणारे जीवनदाते : मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले की, "प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. गंभीर रुग्णांना बरं करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग पहिल्यांदाच होत आहे. आम्हाला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करत आहोत. परंपरेनुसार आपण एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपण रडत नाही बसलो, लढत आहोत.
प्लाझ्मा थेरपीच्या प्रयोगाविषयी मुख्यमंत्री पुढे सांगितलं की, "एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्र सरकारकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आलं. ही काही नवीन गोष्ट शोधून काढलेली नाही. शंभर वर्षांपासून त्याचा उपयोग होत आहे. आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत.
लसीमुळे अँन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे तयार अँन्टीबॉडी आपण रुग्णाला देत आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. पण प्लाझ्मा डोनेशनबाबत बऱ्या झालेल्या रुग्णांना अधिक काळजी घ्यावी लागते. दहा पैकी नऊ रुग्ण आपण बरे केले, कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो.
प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय टीम येऊन गेली तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच ही टीम परत येऊन गेली आणि त्यांनी महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हे माझे एकट्याचे प्रयत्न नाहीत. महाराष्ट्र चिवट आहे, प्रयत्न आणि प्रयोग करणारा, धाडसी आहे. मी तुमच्या पाठीशी नाही तर सोबत आहे."
महाराष्ट्रात 23 ठिकाणी प्लाझ्मा थेरपी महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं, महापालिका रुग्णालयामध्ये थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी एमईडीडी अंतर्गत येणाऱ्या 17 महाविद्यालयं आणि बीएमसीच्या चार रुग्णांलयांमध्ये ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. हे मोठं यश आहे. केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था आहे. कोविड केअर सेंटरमधील बरे होऊन गेलेल्या रुग्णांनी दहा दिवसानंतर पण 28 दिवसांच्या आत दान करायला हवं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच सर्व पालकमंत्र्यांनी याबाबत आपापल्या जिल्ह्यात लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.