(Source: Poll of Polls)
Corona Update | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशांचे उल्लंघन करत लोकांना जमवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंकदर कोरबु, रमजान नदाफ, हुसेन शेख असं या तिघा आरोपींची नावे आहेत.
सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपुरातील सावरगाव येथे ख्वाजा गरीब नवाज कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना सामूदायिक जेवण देखील देण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आधीच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन लागू करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ज्या ठिकाणी मोठी गर्दी होईल, असे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली होती.
मात्र या आदेशांचे उल्लंघन करत लोकांना जमवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंकदर कोरबु, रमजान नदाफ, हुसेन शेख असं या तिघा आरोपींची नावे आहेत. आपत्तीव्यवस्थापन कायदा तसेच भारतीय दंड विधान कलम 188 नुसार या तिघा आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा आरोपींना तात्काळ अटक केली. याआधी एबीपी माझाच्या लोगोचा वापर करत पंढरपुरातीलच एका महाविद्यालयात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खोटी अफवा पसरवण्यात आली होती. त्यावर देखील पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणातील खोटी पोस्ट तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सायबर सेलच्या माध्यमातून घेतला जात असल्याची माहिती सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी दिली.
दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रकराची अफवा पसरवू नये. तसेच खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात यावे असं आवाहनही यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी केलं. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) आवश्यक तेवढा निधी दिला जाईल, असं पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य याची खरेदी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून केली जावी. यास राज्य शासनाने सहमती दिली आहे. आवश्यक असणारे व्हेंटिलेटर, बेड, पीपीई, मास्क, सॅनिटायझर, आयसोलेशन आणि क्वॉरंटाईन सेलसाठी लागणारे साहित्य याची लवकरात लवकर खरेदी करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. प्रारंभी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
सोलापुरातील सर्व आठवडा बाजार आणि जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
सोलापुरात आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केल्या जात आहेत. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आजपासून 31 मार्चपर्यंत जिल्हातील सर्व आठवडी बाजार तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यात येऊ नयेत या सूचना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याची माहिती दिली. सोबतच ज्या खासगी कार्यक्रमात मोठी गर्दी होईल, अशा कार्यक्रमाच्या आयोजकांनीही सहकार्य करत गर्दी टाळण्याचेही आवाहन ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.