Coronavirus | पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शेतकरी सरसावला, 5 क्विंटल मोसंबीचे मोफत वाटप
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्यातील वांगी गावच्या सखाराम शिंदे या शेतकऱ्याने शेतातील पाच क्विंटल मोसंबीचं मोफत वाटप केलं आहे. या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
बीड : कधी आसमानी तर कधी सुल्तानी संकटाशी दोन हात करत लढणारा शेतकरी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही मागे नाही. या संकटामध्ये आपलाही हातभार लागावा म्हणून अनेक जण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करत आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील वांगी गावच्या सखाराम शिंदे या शेतकऱ्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शेतातील पाच क्विंटल मोसंबीचं मोफत वाटप केलं आहे.
सखाराम शिंदे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. मोसंबीची पारंपरिक शेती करत असतात. सध्या कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवा, असा सल्ला दिला जात आहेत. मोसंबीमध्ये सी जीवनसत्व असतं, जे रोगप्रतिकार वाढवण्यास मदत करतं. त्यामुळेच मोसंबीला आज बाजारात मागणी पाहायला मिळत आहे.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या दोनशे ते अडीचशे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यासाठी एका शेतकऱ्याने शेतातील पाच क्विंटल मोसंबी मोफत वाटली. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना या सैनिकांना 'सी' जीवनसत्व मिळावं म्हणून हे पाऊल उचललं आहे.
सखाराम शिंदे यांनी एकूण तीन एकरवर मोसंबीची लागवड केली आहे. आज बाजारात 40 ते 50 रुपये किलो मोसंबी विकली जात आहे. अशाही परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले, 24 तास सेवेत असणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांना बळ मिळावं म्हणून सखाराम शिंदे यांनी केलेल्या या मदतीचे कौतुक होत आहे.
सखाराम शिंदे यांची आणखी एक ओळख म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या पैलवान अक्षय शिंदेचे ते वडील आहेत.