Coronavirus : धक्कादायक! बेड न मिळाल्यामुळं कोरोना रुग्णाचा गाडीतच मृत्यू; व्हायरल व्हिडीओमुळं खळबळ
अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूरहून उपचारासाठी आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला अहमदनगर शहरात कुठल्याच रूग्णालयात आयसीयू बेड न मिळाल्याने त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या दारातच गाडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिर्डी : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. उपचारांअभावी अनेक रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. जिल्ह्यातील एका रुग्णाला उपचारासाठी वेळेवर बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णालयाच्या दारात गाडीतच त्याचा मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूरहून उपचारासाठी आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला अहमदनगर शहरात कुठल्याच रूग्णालयात आयसीयू बेड न मिळाल्याने त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या दारातच गाडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूनंतरही त्या रुग्णाचे हाल संपले नाहीत. मत्यूच्या तब्बल दोन तासांपर्यंत रुग्णाचा मृतदेह रूग्णालया बाहेर गाडीतच होता. या घटनेचा व्हिडीओ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयाच्या दारात उपचारांअभावी एका रुग्णाचा मृत्यू होऊनही यासंदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मात्र यासंदर्भात काहीच माहितीच नसल्याचं समोर येत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील विक्रम अण्णा गायकवाड यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने अत्यवस्थ असताना त्यांनी ड्रायव्हरसोबत अहमदनगर शहर गाठले. सुरुवातीला जिल्हा रूग्णालयात बेड उपलब्ध आहे का? याची चौकशी केली असता एकही बेड शिल्लक नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पुढचे दोन तास शहरातील खाजगी रूग्णालयात बेड मिळतोय का? यासाठी प्रयत्न केला. मात्र कुठल्याही रुग्णालयात त्यांना जागा मिळाली नाही. अखेर पुन्हा ते माघारी जिल्हा रूग्णालयात आले. मात्र तोवर उशिर झाला होता. अखेर त्रास वाढल्यानं आणि वेळीच उपचार न मिळाल्यामुळं विक्रम गायकवाड यांची गाडीतच प्राणज्योत मावळली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला काहीच माहीती नसल्याच समोर आलं आहे. परंतु, सध्या रुग्णांची संख्या वाढत असून बेड्सची संख्या अपुरी असल्याचं मात्र रुग्णालय प्रशासनानं मान्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दररोज सरासरी 2 हजार रुग्ण आढळत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, काल राज्यात 51,751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून नवीन 52,312 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'गरज नसतानाही नातेवाईक रेमेडेसिवीरचा आग्रह करताहेत', सोलापुरात प्रशासन आणि खाजगी डॉक्टरांचा अजब दावा!
- ऑक्सिजनसाठी रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या मास्कचा पुर्नवापर; सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील प्रकार























