(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाबाधित रुग्णाची उपचारादरम्यान चाकूने गळा कापून आत्महत्या; सांगलीच्या रुग्णालयातील घटना
हुसेन बाबुमिया मोमीन असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान या कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप समजू शकले नाही.
सांगली : मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान या कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र नातेवाईकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
मिरज शहरातल्या मालेगाव रस्त्यावरील अमननगर येथील हुसेन बाबूनिया मोमीन वय वर्ष 56 या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुसेन मोमीन यांनी रुग्णालयात धारदार चाकूने आपला गळा कापून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मोमीन यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली,त्यानंतर नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनावर उपचार दिले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच ते आत्महत्या करू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी सुद्धा नातेवाईकांनी केले आहे.
दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा देत,सदर घटनेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती डॉ.सुधीर ननंदकर यांनी दिली आहे. तर हुसेन मोमीन यांनी नेमकी कोणत्या करणातून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. या आत्महत्येची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यांमध्ये झाली असून अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.