महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या, काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) किमान समान कार्यक्रमाच्या बाबतीत एकत्र बसून आढावा घ्यावा आणि निधी वाटपाबाबत भेदभाव संपवावा अशी मागणी काँग्रेस (Congress) नेत्यानी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई : निधी वाटपाच्या बाबतीत काँग्रेसचे जे आक्षेप आहेत ते मिटवावे आणि राज्यातील सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या बाबतीत आढावा घ्यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ही भेट घेतली.
महाविकास आघाडी सरकार वाझे प्रकरणामुळे अडचणीत आले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या महत्वाचे मंत्री आणि नेते यांच्याबरोबर चर्चा केलो आणि आज एच के पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवसस्थानी त्यांची भेट घेतली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्याची मागणी केली. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे दिल्ली आणि मुंबईतील प्रमुख नेते आढावा घेणार आहेत. सध्या कोरोना काळ असल्यामुळे ही बैठक कोरोना आटोक्यात आल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
या भेटीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के.पाटील म्हणाले की, निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप होते. ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिलं. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून त्याचा आढावा घेतला पाहिजे अशीही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की समन्वय समितीच्या व्यतिरिक्त एक समिती नेमण्यात येईल जी किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेईल.
केंद्राच्या कृषी कायद्याला काँग्रेसने विरोध केला असून ज्या राज्यात आपली सत्ता आहे, त्या राज्यात कृषी कायद्याला विरोध करणारा कायदा आणायच्या सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्या होत्या. नुकताच या विषयाच्या समितीची बैठक झाली आणि आज मुख्यमंत्र्यांनी देखील कृषी कायद्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
संजय राऊतांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचा शिवसेनेचा काही संबंध नसल्याचं सांगत एच के पाटील म्हणाले की शिवसेना युपीएचा भाग नाही. सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंहांनी जे काही आक्षेप घेतले होते त्यावर कोर्टाने गंभीर आक्षेप घेतले आहेत असंही ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एकत्र असताना ज्या काही तक्रारी येतात त्या एकत्र बसून सोडवल्या पाहिजेत. कर्जमाफीसारखा विषय समान कार्यक्रमाचा भाग होता, तो एकत्रितपणे सोडवला. आता वीजेबाबत काही करता येईल याची चर्चा करावी लागेल.
विरोधकांवर टीका करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचे संकट वाढत आहे. आपण शक्य तितकी जनतेला मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या काळात मदत करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
एकूणच सरकारमध्ये असूनही काँग्रेसला विविध विषयांवर याआधी नाराजी व्यक्त करावी लागली आहे. पक्षाच्या प्रभारींनी देखील मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन आपली भूमिका मांडली. काँग्रेसच्या या मुद्द्यांवर कारवाई होणार का ? त्यांची नाराजी दूर होणार का हा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar Health: शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सात दिवस विश्रांतीचा सल्ला
'जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झालाय', देवेंद्र फडणवीसांची टीका, आव्हाडांकडूनही चोख प्रत्युत्तर
Pandharpur By-election | पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा, कल्याणराव काळे पुन्हा बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ