नरेंद्र मोदी 2024 मध्ये सत्तेत आले तर 70 वर्षांची लोकशाही राहणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
Nashik News Update : "तीन पक्षांचं सरकार चालवणं किती अवघड आहे याची कल्पना आहे. परंतु, भाजपला हटवायचे असेल तर कडू गोळी घ्यावी लागणार याची कल्पना होती. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले आहे.
Prithviraj Chavan : "समविचारी पक्षांनी एकत्र येत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा दिला पाहिजे. येणाऱ्या 12 निवडणुकीत यश मिळवावे लागेल. फक्त दोन वर्षांचा अवधी आहे, समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे की, मोदींना फक्त काँग्रेसच पराभूत करू शकेल. ते काँग्रेससोबत येणार होते, मात्र आले नहीत. 2024 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आले तर 70 वर्षांची लोकशाही राहणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, "मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. परंतु, नरेंद्र मोदी यांना त्याची चिंता नाही. निवडणूक जिंकण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणचा मुद्दा हाती घेतला जात आहे. रोज नवा मुद्दा पुढे आणला जात असून मंदिर आणि मशिदीचे वाद उकरून काढले जात आहेत. परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसले आहे. कोणत्याही परिस्थितीत चीन मागे हटत नाही."
...त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही एकत्र आलो
महाराष्ट्रात तिन्ही पक्ष एकत्र येत सरकार स्थापण केले आहे. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आगामी महापालिका निवडणूक हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे स्थानीक पातळीवर निर्णय घेण्याचे ठरले असून एकत्र आलो तर भाजपचा पराभव होवू शकतो. भाजपचा पराभव करायचा की पक्ष वाढवणे महत्वाचे आहे? मी दोन पक्षाचे सरकार चालवले आहे. त्यामुळे तीन पक्षांचं सरकार चालवणं किती अवघड आहे याची कल्पना आहे. परंतु, भाजपला हटवायचे असेल तर कडू गोळी घ्यावी लागणार याची कल्पना होती. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सोनिया गांधी यांच्या आदेशानंतर शिबिरे घेतली जात आहेत. राजस्थानमध्ये शिबीर झाले, त्याला मोजके लोक निमंत्रित होते. शिवाय महा अधिवेशना प्रमाणे ते शिबीर झाले नाही. जे ठराव होतात ते या शिबिरात झाले नाहीत. काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी चर्चा आहे. कोरोनामुळे भेटीगाठी होत नव्हत्या. मात्र राजकारण थांबत नव्हतं. सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून चिंतन शिबीर, पक्षाच्या निवडणुका आणि पूर्णवेळ अध्यक्ष असावा असे मुद्द मांडले होते. पक्षांतर्गत निवडणूक झाली पाहिजे, त्यातून नेतृत्व पुढे येईल. काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांची काही मतं तीव्र होती. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला."
"काश्मीरमधील टार्गेट किलिंग ही चिंताजनक बाब"
"काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग होत असून ही चिंताजनक बाब आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहे. परंतु, विरोधी पक्षांसोबत चर्चा केली जात नाही. या पूर्वी चीनसोबत बाद होते. गलवान खोऱ्यात काही झाले नाही असे नरेंद्र मोदी सांगत आहेत. परंतु, तेथे जे काही सुरू आहे, हे परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली आहे.
"मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रामधून उमेदवारी द्यायला पाहिजे होती"
मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी दिली, याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. परंतु, वासनिक यांना महाराष्ट्रामधून उमेदवारी दिली पाहिजे होती. राज्याला त्यांचा उपयोग झाला असता. सहा जागांसाठी सात अर्ज आले आहेत. त्यामुळे कोणाचा तरी एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. परंतु, आम्ही सर्व जण एकत्र आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.