एक्स्प्लोर
चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या बलात्कार पीडित मुलींबाबतच्या वक्तव्यानंतर वातावरण तापले
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाची माफी मागितली असून सुभाष धोटे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर : काँग्रेस नेत्याने बलात्कार पीडित मुलींबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी 'पॉस्कोअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी आदिवासी मुली बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुढे येतात' असं संतापजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध केला जात आहे.
भाजपने या काँग्रेस नेत्यांवर एट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाची माफी मागितली असून सुभाष धोटे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकार कडून पैसे मिळतात आणि त्यामुळे आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, असं अत्यंत संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केलं होतं. या संतापजनक वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात जिल्ह्यातील शेकडो आदिवासी महिला गोळा झाल्या होत्या. आदिवासी महिलांनी काँग्रेसच्या या नेत्यांचा जोरदार निषेध केला.
हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याची भावना संतप्त प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली होती. या वेळी संतप्त महिलांनी या काँग्रेस नेत्यांविरोधात नारेबाजी करत त्यांच्या फोटोला चपला मारून आणि थुंकून आपला राग व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे बलात्कार पीडित मुलींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी बलात्कार पीडित मुलींबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याचा भाजप तीव्र निषेध करण्यात आला. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर अंजली घोटेकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पीडित आदिवासी मुलींवर पैशांसाठी लांच्छन लावणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणानंतर लोकांमध्ये पसरलेला रोष पाहता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांनी आदिवासी समाजाची माफी मागितली आहे. चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची पदावरून हकालपट्टी होणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून सुभाष धोटे यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांना विनंती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या बाबत पक्षश्रेष्ठींना देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी वैयक्तिकरित्या पण आदिवासींची माफी मागितली आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले असले तरी वडेट्टीवार यांच्यावर काय आणि कोण कारवाई करणार? असा सवाल केला जात आहे.
राजुरा येथील वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे समाजमन सुन्न झाल असताना नेत्यांच्या या वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
