(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balasaheb Thorat : राज्यपालांमधील 'रामशास्त्री' आता जागा झाला, बाळासाहेब थोरातांचा टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील रामशास्त्री आता जागा झाला आहे, आतापर्यंत झोपला होता असे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला.
Balasaheb Thorat : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील रामशास्त्री आता जागा झाला आहे, आतापर्यंत झोपला होता असे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला. अध्यक्षपद हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या मंत्र्यांची पाटी राहील की नाही, पण अध्यक्षांच्या नावाची पाटी मात्र राहील असेही थोरात म्हणाले. देवेंद्रजी तुम्ही त्यांचा कार्यक्रम केला, आता त्यांना भाषण देता येणार नाही. देवेंद्रजी तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले कुणास ठाऊक असेही थोरात म्हणाले. विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर थोरात सभागृहात बोलत होते.
अध्यक्ष म्हणून तुमचा लौकिक राहील
विधानसभा अध्यक्षपद हे पद खूप मोठं आहे. आत्तापर्यंत अध्यक्ष हे खूप अनुभव असलेल्या नेत्याला बनवले जात होते. पण आपण तरुण वयातील अध्यक्ष म्हणून आपलं नाव लागलं. चांगला अध्यक्ष म्हणून तुमचा लौकिक राहील असेही थोरात म्हणाले. अध्यक्ष हा निरपेक्ष, सर्वांना समान वागणूक दिला असावा. आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याशी तुमचे संबंध चांगले आहेत. तुम्ही सगळीकडे गेलेत पण काँग्रेस का बाजूला ठेवली असा टोला देखील थोरात यांनी लगावला. सगळ्यांना आपले वाटावेसे असे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. आपल्या कायद्याच्या अभ्यासाचा सभागृहाला उपयोग होईल. सरकार चालायचे असेल तर सभागृह ही सर्वातच महत्वाची गोष्ट आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळं सदस्यांना सभागृहात जास्त बोलता आले नाही. पुढच्या अडीच वर्षात सदस्यांना विचार मांडण्याची संधी मिळेल याची खात्री आहे. पूर्वीच्या काळात सदस्य बोलत असायचे त्यावेळी सभागृह भरलेलं असायचे.
राहुल नार्वेकर विधानसभेचे 20 वे अध्यक्ष
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या 'चाव्या' आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.
नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.