एक्स्प्लोर
शिवेंद्रराजेंच्या घरात घुसण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, मध्यरात्री राडा
दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला.

सातारा: आणेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मध्यरात्री चांगलाच राडा झाला. दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला. खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या. काय आहे नेमका वाद? दोन्ही राजेंमध्ये आणेवाडी टोलनाक्यावरुन राडेबाजी सुरु आहे. हा टोलनाका गेली बारा वर्षापासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. मात्र यावेळी रिलायन्स कंपनीनं हा टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्या हातून काढून घेतला आणि तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतप्त झालेत. दोन दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी टोलनाक्यावरील कामगारांचा प्रश्न उपस्थित केला होता. आता हा टोलनाका आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसलेंनी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आणेवाडी टोलनाक्यावर ठाण मांडलं. आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आले तर बघतोच असा इशाराही दिला. त्यामुळे काल संध्याकाळपासून टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. याशिवाय आमदार शिवेंद्रराजेंना आणेवाडी टोलनाक्यावर जाण्यास मज्जाव केला होता. काल रात्री हा टोलनाका आमदार शिवेंद्रराजे समर्थकांकडे जाणार असल्यामुळे आणि शिवेंद्रसिंह आणेवाडी टोलनाक्यावर जाणार असल्यामुळे, खा. उदयनराजे भोसले हे स्वत: संध्याकाळी सात वाजल्यापासूनच टोलनाक्यावर तळ ठोकून होते. आ शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आणेवाडी टोलनाक्यावर गेलेच नाहीत. नंतर उदयनराजे भोसले हे कार्यकर्त्यांसोबत आ शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर गेले. तिथे त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंना शिवीगाळ करत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या दिशेने दोन बंदुकीतून फायरिंगही झालं. त्यावेळी बंगल्यात असलेल्या शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडकी, गज घेऊन उदयनराजे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोडही केली. या घटनेमुळे परिसरात चांगलाच तणाव होता. दोन्ही राजेंच्या बंगल्याबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. संबंधित बातम्या
.. तर याद राखा, उदयनराजेंचा आणेवाडी टोल प्रशासनाला इशारा
आणखी वाचा























