(Source: ECI/ABP News/ABP Majha)
थंडीचा कडाका : मुंबई 16 अंशांवर; वेण्णा लेक परिसरात पुन्हा बर्फाची चादर
देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. मुंबईच्या तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.
सातारा : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात आणि मुंबईतही तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली (Cold Wave) शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. परिणामी मुंबईच्या तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरसह साताऱ्यातही तापमानात घसरण पाहायला मिळत आहे. सातारा, महाबळेश्वर मध्ये तापमानाचा पारा 9 अंश सेल्शिअवर पोहोचला आहे. तर, पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या वेण्णा लेकमध्ये 4.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
वेण्णा लेक भागात बर्फाची हलकी चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळं इथं आलेल्या पर्यटकांसाठी ही परवणीच ठरत आहे. महाबळेश्वर, वेण्णा लेक आणि वाई इथं अनुक्रमे 9, 4.5 आणि 8 अंश सेल्शिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे.
तिथं महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी परवणी ठरत असतानाच मुंबईकरांना आता थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंबईतील तापमान कमालीचं कमी नोंदवण्यात आलं. 16-17 अंशांवर पोहोचलेला तापमानाचा हा आकडा आतापर्यंतच्या निचांकी तापमानाची नोंद करत आहे.
फक्त मुंबईच नव्हे, तर नाशिक 8.4, परभणी 7.6, नागपूर 8.6, गोंदिया 7.8, सांगली 12.6, अमरावतीमध्ये 12.5 अंश सेल्शिअस तापमानासह कडाक्याची थंडी पाहायला मिळाली. पुढील काही दिवसही राज्यात तापमानात होणारी घसरण अशीच सुरु राहणार आहे.
22Dec,11PM, Mumbai & Maharashtra winter likely to cont tomorrow with Mumbai min temp around 16-17°C, Pune single digit as per IMD GFS guidance. Parts of Marathwada, Vidarbha likely to cont with same trend. Temp likely to rise gradual & models show likely lowering near year end ????♂️ pic.twitter.com/haLWRCwQXh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 22, 2020
पर्यटकांचा ओघ गिरीस्थानांकडे
राज्यात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं आता लॉकडाऊनची परिस्थीती काहीशी सुधारत असल्याची पाहत गिरीस्थानांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कुठं गुलाबी तर कुठं बोचरी थंडी सध्या सर्वत्रच पाहायला मिळत आहे. तापमानाच झालेली ही घट पाहता पर्यटन स्थळं पुन्हा बहरु लागली आहेत. अनेक महिन्यांपासून बंद असणारे आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसायही पुन्हा वेग धरु लागले आहेत. या साऱ्यामध्ये कोरोना निर्बंधांचं पालन करत आरोग्याचीही काळजी घेण्याचं आवाहन शासनाकडून देण्यात येत आहे.