मुख्यमंत्री ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा, मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. आज मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. परवा सोलापूर दौरा करुन त्यांनी नुकसानीची पाहणी केली होती. मात्र मदतीबाबत कुठलीही घोषणा केली नव्हती. त्यामुळं आज मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
परतीच्या पावसाचं संकट टळलेलं नाही, घाईगडबडीने निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री
सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी सोलापूर विमानतळावरून उद्धव ठाकरे हे तुळजापूर तालुक्यातील काटगाव या गावात पाहणी दौरा करतील. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या हरणी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला. या पुरात हाताशी आलेलं संपूर्ण पीक अक्षरशः वाहून गेलं आहे, उभा ऊस आडवा झाला आहे. शेतीचं अतोनात नुकसान झालं असून घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून इथल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नव्हते. त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
संबंधित बातम्या
केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही : मुख्यमंत्री
केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी : देवेंद्र फडणवीस