मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांनी 25 कोटींचे 'हिरोईन' पकडले, पण 'हिरॉईन' नव्हती म्हणून....
Cm Uddhav Thackeray : जगातील अमली पदार्थ जणू काही फक्त महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष पथक पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
Cm Uddhav Thackeray : जगातील अमली पदार्थ जणू काही फक्त महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष पथक पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून महाराष्ट्राच्या ख्यात्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला अशा पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागपूरमध्ये आयोजित जलदगती डीएनए तपासणी आणि वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार, गृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोई, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकर, उपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई, उपस्थित होते. त्यावेळी एनसीबीच्या कारवाईवरून तापलेल्या वातावरणावर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला.
एनसीबी कारवाईमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे, त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारवाईवर अप्रत्यक्ष भाष्य करत समाचार घेतला आहे. अमली पदार्थाला सध्या मोठे पेव फुटले आहे आणि त्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य केले जात आहे. पण महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते. अमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात 'हिरो' होते आणि त्यामुळे या विशेष चमूलाही प्रसिद्धी मिळाली. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी 25 कोटी रुपयांचे 'हिरोईन' पकडले, पण त्यात 'हिरॉईन' नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या कामगिरीची कुठेही दखलघेतली गेली नाही, कौतुक झाले नाही. महाराष्ट्र पोलीस दल मजबूत आहे, तत्पर आहे. अशा महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो आपल्याला मोडून काढायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात उद्घाटन झालेल्या फास्ट ट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डिएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीने शक्ती कायदा तयार केला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचूकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर त्वरित कारवाई करून कायद्याचा एका वचक निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.