साताऱ्याच्या हद्दवाढीला मंजुरी, महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीला अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे साताऱ्याला महानगरपालिकेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीला आज यश मिळाले. मागील 25 वर्षात दोन वेळा नोटिफिकेशन निघाली, मात्र हद्दवाढ झाली नव्हती. सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वाक्षरी करुन मंजुरी दिली. हद्दवाढ झाल्याचे पत्र आज अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रराजेंना सुपूर्द केलं. या निर्णयामुळे सातारा नगरपालिका ही 'क' वर्ग महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. त्यामुळे साताऱ्याला महानगरपालिकेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून सातारचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा शहर हद्दवाढीबाबत वारंवार पाठपुरावा ठेवला होता. शिवेंद्रराजेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर हा हद्दवाढीचा प्रस्ताव आता टेबलवरच राहणार असे सातारकरांना वाटत होते. मात्र अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये आजही असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना आज यश आले आणि अजित पवार यांनी या हद्दवाढीच्या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी मिळवली.
सातारा जिल्ह्यातील सध्याची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे तर आणखी सव्वा लाख लोकसंखेची भर आता सातारा शहराच्या हद्दवाढीत होणार आहे. त्यामुळे लवकरच सातारा नगरपालिका ही महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करेल असेच दिसत आहे. या हद्दवाढीमध्ये सातारा शहरालगत असलेला अजिंक्यताराही हद्दवाढीत आला असून या परिसरातील शाहूनगरचा त्रिशंकू भागही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा शहरालगतची असलेली मोठी शाहूपुरी ग्रामपंचायतही आता सातारा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे. त्याचबरोबर सातारा शहरालगत असलेल्या पुणे-बंगळुरु महामार्गाचा अलिकडचा म्हणजे बॉम्बे रेस्टॉरंन्ट, वाढे फाटा चौक, शिवराज पेट्रेल पंप असा संपूर्ण भागाचा समावेश सातारा शहराच्या या हद्दवाढीत केला आहे. या हद्दवाढीमुळे आता सातारकरांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया साताऱ्याच्या हद्दवाढीमुळे आता सातारा महानगरपालिका होण्यासाठी मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. बराच पाठपुरावा केल्यानंतर आज त्याबाबतचा निर्णय झाला. सातारा महानगरपालिका होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. शहरालगतच्या भागात यामुळे विकास करता येईल. शिवाय शहराच्या उत्पन्नातही यामुळे भर होईल. सातारा 'अ' वर्ग नगरपालिका आहे. राष्ट्रीय महामार्गाचा पश्चिम भाग पकडून हद्दवाढ केली आहे. वेण्णा नदीपर्यंत ही हद्दवाढ करण्यात आली आहे."
अनेक वर्षांपासून हद्दवाढीचं घोंगडं भिजतच सातारा पालिकेची स्थापना 1851 मध्ये झाली. त्यानंतर 1882 मध्यो गोडोली, सदरबझार आणि कॅम्प परिसरातील लहान नगरपालिकांची (सबअर्बन म्युनिसिपल) स्थापना झाली. 1968 मध्ये सातारा पालिकेचा विस्तार होत हा भाग सातारा पालिकेत समाविष्ट झाला. परंतु त्यानंतर अजूनही साताऱ्याची हद्दवाढ झालेली नाही. 1977 मध्ये हद्दवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. आता म्हणजेच 2020 मध्ये हद्दवाढीला मंजुरी देण्यात आली.