#JanataCurfew जनता कर्फ्यू वाढू शकतो, संजय राऊत यांचे संकेत
कोरोनाचा राज्यात दुसरा बळी गेलाय, आता परिस्थिती गंभीर होत चालली असून मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवू शकतात अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचं जाळं पसरत पसरत अखेर मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार आज देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुंबईकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला आहे, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलं.
#JanataCurfew मुख्यमंत्री जनता कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊत यांचे संकेत
मुंबईतील रस्ते ओस पडले आहेत कारण सर्वाधिक लोकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत घरी राहणं पसंत केलंय आणि याचाच परिणाम म्हणून मी आज केवळ तेरा मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचलो असं संजय राऊत यांनी सांगितलं. मुंबईकरांनी या कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिसला आहे आणि आता या युद्धाविरोधात सर्वाना लढायचं आहे असंही त्यांनी म्हटलं. खरंतर आज जो कर्फ्यू दिसत आहे तो आठ दिवसांपूर्वीच लागायला हवा होता हे माझं वैयक्तिक मत आहे असं राऊत यांनी म्हटलं.
#JanataCurfew | गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटीवर जनता कर्फ्यूचा काय परिणाम?
संजय राऊत सामनाच्या कार्यालयात असल्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होमबद्दल विचारलं असता, मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करतोय कारण सामना हेच माझं घर आहे असं राऊत यांनी म्हटलं. माझ्या घरीदेखील सर्वांनी स्वत:ला होम क्वॉरंटिन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हा जनता कर्फ्यू वाढवू शकतात, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, मृत्यूची संख्या रोखण्यासाठी कठोर पावलंही उचलावी लागतील. या परिस्थितीमुळे आर्थिक अडचण येणार आहे हे नक्की पण देशासाठी हे करावं लागणार आहे. नुसतं वंदे मातरम् आणि भारत माता की जय बोलून चालणार नाही , देशासाठी काही करायचं असेल तर हे करायला हवं.
आर्थिक मंदीविरोधातसुद्धा सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं आणि 2008नंतर आता कोरोनामुळे आर्थिक मंदी येणार आहे. मुंबईतील गिरण्या जेव्हा बंद पडल्या त्यानंतर गुन्हेगारी फार वाढली होती, आता मात्र हे सर्व होण्यापासून रोखता आलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे. मात्र मला वाटतं विरोधीपक्ष यातही राजकारण करेल. पण आता खुर्च्या नाही तर राज्य वाचवण्याची गरज आहे त्यामुळे याबाबतीत तरी विरोधकांनी राजकारण मधे आणू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं.
#JanataCurfew | चर्चगेट, अंधेरी, दादरमध्ये जनता कर्फ्यूची काय परिस्थिती?