(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केव्हाही बरा, तुम्ही तर नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरुन उठवून जेलमध्ये टाकलं; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Session : आम्ही अडीच वर्षे चांगलं काम करणार आणि त्या पुढची पाच वर्षे आम्हीच सत्तेत राहणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई: आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही गद्दारी केली नाही, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत म्हटलं. असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, तुम्ही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षांना लगावला. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आज कंत्राटी मुख्यमंत्री असा करण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या घटनेचा आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आणि उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांवर टीका केली.
रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरुन टीका केली. पण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कोणी काही बोललो नाही. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी डॅशिंग काम केलं. पण आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला. मग अशा माणसाला भेटायला जायचं तर रांग का बघायची?"
एक से भले दो, आता आम्ही दोघे आहोत
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरुन उरायचे. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन असं म्हणायचे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मलासुद्धा घेऊन आले. आता तर आम्ही दोघे आहोत, 'एक से भले दो' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षाच्या लोकांनी राज्यामध्ये सरकारने काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात मांडलं पाहिजे. अजित पवार रोखठोक बोलतात. आम्ही शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत पाच हजारावरून 15 हजार केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षाने हलकं फुलकं वातावरण करायचं असतं, पण तुम्ही आम्हाला बोचंल असं बोलत होता असं मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना उद्देशून बोलले.
तुम्हाला विरोधी पक्षनेते व्हायचं होतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणात जयंत पाटील यांना टोला लगावला. जयंत पाटील काल राष्ट्रीय प्रवक्त्यासारखं बोलत होते असं सांगत ते म्हणाले की, "जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचं होतं. पण त्यांना ते होता आलं नाही, ते अजित पवार यांना देण्यात आलं. या ठिकाणी दादांची दादागिरी चालणारच. ते आमचे मित्र आहेत."
आम्ही गद्दारी केली नाही...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. काँग्रेसला जवळ करायचं नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी मोठी गर्दी झाली असती का?"