CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : ज्यांनी बीएमसीवर जेसीबी चालवला त्यांना ट्रॅक्टर आणि बीच कॉम्बरमधील फरक काय कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, समुद्र किनारी ट्रॅक्टर चालवला की आणखी काय चालवले यावरून टीका करण्याआधी त्यांनी व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक होते.
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : ज्यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) तिजोरीवर जेसीबी चालवला त्यांना ट्रॅक्टर आणि बीच कॉम्बरमधील फरक काय कळणार असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. मुंबईतील समुद्र किनारी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता मोहिम राबवली होती. त्यावेळी त्यांनी बीच कॉम्बर चालवला. त्यावरून ठाकरे यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, समुद्र किनारी ट्रॅक्टर चालवला की आणखी काय चालवले यावरून टीका करण्याआधी त्यांनी व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक होते. मी चालवले ते बीच कॉम्बर होते. कॉम्बरमुळे समुद्राच्या पाण्यासोबत किनाऱ्यावर येणारे दगड, प्लास्टीक असा सगळा कचरा जमा होतो. त्यामुळे त्यांनी टीका करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला, मुंबईच्या विकासावर बुलडोझर चालवला, त्यांना काय कळणार अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मी दिल्ली, तेलंगणाला गेलो, गावी गेलो तरी ह्यांना अडचण आहे. तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री हवाय की लोकांमध्ये फिरून काम करणारा हवा असा प्रश्न लोकांना विचारतो असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
कोण फडतूस आहे हे लोकांनी दाखवलं आहे
मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सरकार फडतूस आहे की महायुती फडतूस की आणखी कोण फडतूस आहे, तीन राज्यातील लोकांनी दाखवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या अधिवेशनात विरोधी पक्षाचे अवसान गळाले असल्याचे त्यांनी म्हटले.
पटेलांच्या मुद्यावरील प्रश्नाला बगल?
नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर महायुतीमधील मतभेद दिसू लागले आहे. मलिक यांच्यावरील आरोपांबाबत आक्रमक दिसता, पण प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबतच्या संबंधाचे काय, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आले होते. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला. बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असलेल्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून ज्यांनी बडतर्फ केले नाही, मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवणारा कोणाचा माणूस होता, अशांनी यावर बोलू नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले
सुप्रीम कोर्टाने लोकांच्या मनातला निकाल दिला आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी लोकांच्या मनातील स्वप्न पूर्ण केले. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर दिली आहे.