शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरु करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, दर्जेदार रस्त्यांचं जाळे तराय करण्याच्याही सूचना
शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
CM Devendra Fadnavis : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी 100 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, श्रीमती मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव ए.दशपुते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्यासाठी नियोजन करावं
राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतीमानतेने करावयची असून त्यासाठीच्या प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणे पर्यंतचे 76 कि.मी. लांबीचे काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारी पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्ज रोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुबंई पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंकचे काम ही गतीने पूर्णत्वास न्यावे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे नाशिक मुबंई या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे सुधारणा करण्याचे काम ही तातडीने पूर्ण करावे. तसेच मंत्रालय परिसरात नविन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरवात येत्या शंभर दिवसात करण्याचे सूचित केले.
रस्त्यांच्या दुर्तफा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घ्या
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडल्या जाणे आवश्यक आहे. त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी. विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम बीओटी तत्वार करण्याचे धोरण स्विकारावे. विविध विभागांच्या बांधकामां संदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या बांधकामासाठीचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जैदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतीमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असण्यावर प्राधान्याने महिला प्रवाश्यांसाठी प्रसाधन गृहाची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबतची माहिती विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिली. कार्यक्षमता, गुणवत्ता,पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत. विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.