एक्स्प्लोर
विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गर्दीचा फटका, उपस्थितांसाठी नियमावली बनणार
आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने VIP मंडळी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ घुसले होते. त्यामुळे शासकीय महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दाम्पत्यासह वारकरी दाम्पत्यालाही सफोकेशनचा (गुदमरणे) त्रास झाल्याची चर्चा सुरु झाली होती.
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने VIP मंडळी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ घुसले होते. त्यामुळे शासकीय महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दाम्पत्यासह वारकरी दाम्पत्यालाही सफोकेशनचा (गुदमरणे) त्रास झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच रुक्मिणी मातेची पूजा करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सत्काराला उपस्थित न राहता थेट विश्रामगृहावर गेल्या. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने शासकीय महापूजेदरम्यानच्या उपस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली बनविण्याची मागणी विधी व न्याय विभागाकडे केली आहे.
यंदा शासकीय महापूजेवेळी गाभाऱ्यात मुख्यमंत्री आणि वारकरी दाम्पत्यासोबत काही मंत्री व खासदारांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुरक्षारक्षक आणि इतर व्हीआयपींमुळे विठ्ठल गाभारा आणि चौखांबीमधील प्राणवायू खूपच कमी झाला होता.
विठुरायाचा गाभारा अर्थात गर्भगृह ही एक छोटीशी खोली असून देवासमोर जास्तीत जास्त 7 ते 8 जण उभे राहू शकतात. पूजेच्यावेळी पुजारी आणि पूजा करणारे इतर तीन जण मिळून चार जणांना या गाभाऱ्यात तब्बल 40 मिनिटे थांबावे लागते. या गाभाऱ्याची रचना पाहता येथे हवा खेळती राहण्यासाठी पूर्वी असलेले नैसर्गिक झरोके नूतनीकरणात गायब झाले. त्यामुळे आता हवा खेळती राहण्यासाठी फक्त वातानुकूलित यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.
सर्वसाधारण गाभारा आणि चौखांबी या अरुंद भागात 20 पेक्षा जास्त व्हीआयपींच्या गर्दीमुळे गाभाऱ्यात असणाऱ्या प्रत्येकाला श्वसनाचा त्रास होत होता. यातच जवळपास 40 मिनिटे अशा वातावरणात राहणे नक्कीच त्रासदायक बनत गेले.
एकादशीची महापूजा झाल्यावर विठ्ठल गाभाऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसाठी घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हीआयपींमुळे मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याला त्रास झालाच, शिवाय या गर्दीत विठुरायालाच शोधावे लागत होते.
रुक्मिणी मातेचा गाभारा थोडा मोठा असूनही येथे गर्दी तशीच राहिल्याने हा त्रास होतच राहिला. यातच विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात मार्बल लावल्याने याचा विपरीत परिणाम मूर्ती व गाभाऱ्यातील वातावरणावर होत आहे. मार्बल तातडीने हटविण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्या आहेत.
या मार्बलमुळे गाभाऱ्यातील उष्णता वाढत असून झालेल्या गर्दीमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत राहिले. त्यामुळेच पूजेवीळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला सफोकेशन झाले. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा होताच अमृता फडणवीस मंदिर समितीच्या सत्काराला उपस्थित न राहता विश्रामगृहावर निघून गेल्या.
या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दाखल घेत, आता यापुढे मुख्यमंत्र्यांच्या पूजेला गाभाऱ्यात आणि चौखांबीमध्ये नेमके किती लोक उपस्थित ठेवायचे? याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जाईल. त्यानंतर याबाबत नियमावली ठरविण्याची मागणी विधी व न्याय विभागाला करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश मंदिर समिती प्रशासनाला दिले आहेत..
दरम्यान पूजेच्या वेळी झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही तक्रार केली नसली तरी प्रशासनाने मात्र ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यापूर्वीही दोन मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना असाच त्रास झाला होता. परंतु त्यावेळच्या प्रशासनाने हा त्रास कायमचा बंद करण्यासाठी कोणतीच कारवाई केली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement