कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीदेखील राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,"कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाच्या दोन मोठ्या लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. त्यामुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे".
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन
आज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगानं वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावं लागून ऑक्सिजनची मागणी देखील वाढू शकते. आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका ,वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळं आजारी पडलेले दिसत आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. आपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपलं सुविधांमध्ये वाढ केली आहे पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळं समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आवाहन आहे की, नियम पाळा. सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,"अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसं झालेलं नाही, तिथं रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दखल होण्याचं प्रमाणही वाढू शकतं. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे".
संबंधित बातम्या
Maharashtra covid 19 new guidelines : राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध , दिवसा जमावबंदी तर रात्री 11 ते पहाटे 5 नाईट कर्फ्यू
मुंबई महानगरात प्रत्येक महापालिकेची वेगळी नियमावली, नागरिक संभ्रमात
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha