Chhattisgarh Naxal : छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; तीन नक्षल्यांना कंठस्नान
Chhattisgarh Naxal: छत्तीसगड राज्यातील कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
कांकेर : छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून इतर काही नक्षली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम राबवली असता, या परिसरात शस्त्रसाठा देखील आढळून आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात डीआरजी आणि बीएसएफने संयुक्त ऑपरेशन राबवित नक्षलवाद्यांच्या (Naxal) छुप्या कारवाईचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे कांकेरचे एसपी इंदिरा कल्याण एलेसेला यांनी स्पष्ट केले आहे.
तीन नक्षल्यांना कंठस्नान
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या घातपाताच्या घटना घडवण्याच्या बेतात असलेले काही नक्षली कांकेर येथील कोयलीबेडा परिसरातील जंगलात जमल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्च मोहीम राबवली. दरम्यान काही नक्षल्यांचा मागवा पोलिसांना लागला असता त्या दिशेने पोलीस जात असतांना अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात 3 नक्षल्यांचा खात्मा झाला असून दोन शस्त्र देखील हसत्यगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा राखीव दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी मिळून राबविलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला हे यश आले असून कोयलीबेडा परिसरातील जंगलात सुरू असलेला नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.
एक दिवसापूर्वी सुकमा येथे घडली अशीच घटना
या परिसरात सध्या पोलीस तपास करत असून आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवार 24 फेब्रुवारीला सुकमा येथे देखील अशाच प्रकारची चकमक सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली होती. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी जंगलात झडती घेतली असता यात एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि काही स्फोटक साहित्यासह शस्त्र सापडून आले होते. नक्षल प्रभावित क्षेत्रात पोलिसांकडून सतत शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची चाहूल लागताच जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार सुरू केला. यावेळी सुरक्षा दलाच्या गोळ्यांना एका नक्षल्याचा बळी गेला, तर उर्वरित नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून गेले. गोळीबार थांबल्यानंतर जवानांनी जंगलात शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये या नक्षलवाद्याचा मृतदेह आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
Gadchiroli Naxal : माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला; प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले स्फोटक साहित्य केले नष्ट