शाळा प्रवेशासाठी नियमात बदल, पहिलीसाठी 6 वर्ष तर नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण आवश्यक
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 31 डिसेंबरपर्यत पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण तर प्ले ग्रुप/नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे.2021-22 या शैक्षणिक वर्षापासून यावर अंमलबजावणी होणार आहे, असा आदेश सरकारने काढला आहे.
मुंबई : शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्याबाबत काल शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाबाबत शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये 31 डिसेंबर मानिव दिनांक गृहीत धरून या दरम्यान विद्यार्थ्याचे वय पहिली वर्गाच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर व प्ले ग्रुप / नर्सरीसाठी प्रवेश घेण्यासाठी किमान 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रवेश घेताना 31 डिसेंबरपर्यत विद्यार्थ्याचे वय पहिली साठी 6 वर्ष पूर्ण व नर्सरी / प्ले ग्रुप साठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे
याआधी 30 सप्टेंबर ही मानिव दिनांक गृहीत धरली जात असताना बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार हा शिक्षण विभागाने आज शासन निर्णय जाहीर करून पुढील वर्षांपासून प्रवेशासाठी याची अंमलबजावणी केली जाणार आहे. इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीची वयोमर्यादा सहा वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या शाळांमध्ये काही वेळा नियमांचे उल्लंघन होत होते.
यामुळे सर्व मंडळांच्या शाळांतील प्रवेशाच्या नियमांत समानता यावी यासाठी शासनाने 21 जानेवारी, 2015 मध्ये शासन निर्णय जाहीर करून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर 31 जुलै रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण करणारा विद्यार्थी पहिलीसाठी पात्र ठरेल, असे निश्चित केले. ही मानिव दिनांक 25 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयानुसार 30 सप्टेंबर करण्यात आली. यानंतर प्राथमिकच्या शिक्षण संचालकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने सुधारित निर्णय घेत मानिव दिनांक 31 डिसेंबर करण्याचे ठरविले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबरपूर्वी अनुक्रमे तीन व सहा वर्षे पूर्ण होणे बंधनकारक असेल. यामुळे विद्यार्थ्यांचे सहा महिने वाचू शकतील, असे मत व्यक्त होत आहे.