Lok Sabha Election 2024 : Exclusive : महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Lok Sabha Election 2024 राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या आघाड्यांमध्ये सरळ लढत असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. 'एबीपी माझा'च्या 'झिरो अवर' या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी राहिला असताना राजकीय पक्षांनी आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) या आघाड्यांमध्ये सरळ लढत असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीमधून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 'एबीपी माझा'च्या 'झिरो अवर' या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत एकीकडे बच्चू कडू यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 'झिरो अवर' या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून 51 टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
अपक्ष की कमळाच्या चिन्हावर?
नवनीत राणा या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी राणा यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्याआधी राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीकडून नवनीत राणा या विजयी होतील असे म्हटले असले तरी नवनीत राणा लढणार कोणत्या पक्षाकडून हा मोठा प्रश्न आहे. राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तर, दुसरीकडे बच्चू कडू यांनीदेखील त्यांनी प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली असली तरी चिन्ह, पक्ष कोणता असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
बच्चू कडू महायुतीसोबतच राहतील
बच्चू कडू हे आमच्यासोबतच राहतील. त्यांच्याशी आम्ही चर्चा करु. त्यांना आम्ही विश्वासात घेऊ. बच्चू कडू यांचा विश्वास मोदीजींच्या नेतृत्त्वावरच आहे. बच्चू कडू हे कोणत्याही निर्णयाविरोधात जाणार नाहीत, याचा विश्वास आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नवनीत आणि रवी राणांचा देवेंद्र आणि मोदीजींवर
नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विश्वास देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर आहे. महायुतीमध्ये आम्ही आहोत, हे त्या दोघांनी एक नव्हे शंभरवेळा सांगितलं आहे. नवनीत राणा, रवी राणा आणि बच्चू कडू या सर्वांचा विश्वास मोदीजी आणि देवेंद्रजींवर आहे. अमरावतीत आम्ही 51 टक्के मतं घेऊन नवनीत राणा जिंकतील असं बावनकुळेंनी सांगितलं.
VIDEO : अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?