कोरोना रुग्णाची फरफट, बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास
वरोरा येथील किशोर नरहरशेट्टीवार असं या रुग्णाचं नाव असून काल ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात एकही बेड मिळाला नाही.

चंद्रपूर : कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे तशी आरोग्य यंत्रणाची खडबडून पुन्हा जागी झाली आहे. अनेक ठिकाणचे बंद केलेले कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. पहिल्या वेळी कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती त्यावेळी अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील एका कोरोना रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा क्लेशदायक प्रवास करावा लागला आहे.
वरोरा येथील किशोर नरहरशेट्टीवार असं या रुग्णाचं नाव असून काल ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात एकही बेड मिळाला नाही. त्यानंतर अॅम्ब्युलन्सने ते तेलंगणा राज्यात देखील गेले. मात्र तिथेही बेड न मिळाल्याने ते चंद्रपुरात परत आले. या सर्व खटाटोपात 20 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला. अखेर या सर्व क्लेशदायक प्रवासानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी 1010 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 14 मृत्यू झाले असून सक्रिय बाधितांची संख्या 6549 एवढी झाली आहे.
मात्र जिल्ह्यात कोरोना स्फोट झाल्यानंतरदेखील आरोग्य यंत्रणा ढिम्म असून या कालावधीत ना खाटा वाढल्या- ना ऑक्सिजन-ना व्हेंटिलेटर. दोनच दिवस आधी चंद्रपूर शहरात एका कोरोनाबाधित वृद्धाची शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर परवड झाल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं होतं. रमेश स्वान असं या 75 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचे नाव असून तब्बल 9 तास शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर ते फूटपाथ वर पडून होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची अवस्था 'कुणी बेड देता का बेड' अशी झाली आहे. नरहरशेट्टीवार परिवाराने या परिस्थितीविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. एकतर बेड आणि सुविधा द्या नाहीतर इंजेक्शन देऊन जीव घ्या अशी काळीज फोडणारी भाषा बाधितांचे कुटुंबीय बोलून दाखवली आहे.























