(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रपुरातील जनतेलाही दारुबंदी नकोशी? दारुबंदी हटवण्यासाठी जवळपास 3 लाख निवेदनं
दारुबंदी समिक्षा समितीला दारुबंदीच्या विरोधात 2 लाख 82 हजार निवेदनं आली आहेत. दारूबंदी समिती हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी समिक्षा समितीला निवेदन देण्याची मुदत मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता संपली. समितीला तब्बल 2 लाख 82 हजार 412 निवेदनं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे यातील जवळपास 20 हजार 800 निवेदनं दारुबंदीच्या समर्थनार्थ आहेत तर 2 लाख 82 हजार निवेदनं दारुबंदीच्या विरोधात आहेत. दारुबंदी समिती हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचं जनमानस पुन्हा एकदा दारुबंदीच्या मुद्दावरून ढवळून निघालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 ला दारुबंदी लागू करण्यात आली होती. मात्र राज्यात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारने या दारुबंदीच्या समीक्षेचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सहा लोकांचा समावेश आहे. या समितीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर मनपा आयुक्त आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दारुबंदीचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास करण्यासाठी समीक्षा समितीने 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत लिखीत स्वरुपात अभिप्राय मागवले होते.
तर दुसरीकडे दारूबंदी समिती हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते समीक्षा समिती ही पूर्वग्रह दूषित असून तिच्या कामात पारदर्शकता नाही. सर्वात मुख्य म्हणजे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच दारुबंदी उठवण्यासाठी काम करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
सरकार आणि सामाजिक कार्यकर्ते दारुबंदीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभे ठाकले असले. तरी चंद्रपुरातील सामान्य लोकांना मात्र दारुबंदी नकोशी झाल्याचंच चित्र आहे. व्यापारावर झालेला विपरीत परिणाम, पर्यायी अंमली पदार्थांचा वाढता वापर आणि मोठा आर्थिक फायदा असल्यामुळे दारु तस्करीत उतरलेली तरुण मुलं यासारखी अनेक कारणं दारुबंदीच्या माथी मारली जात आहे.
दारुबंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटणार असल्याचं पारोमिता गोस्वामी यांनी सांगितलं आहे. यासोबतच दारूबंदी कायम राहावी म्हणून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे दारूबंदीचा मुद्दा कॅबिनेटसमोर येण्याआधीच त्यावर मोठा गदारोळ माजणार हे मात्र नक्की आहे.