...तर राऊत यांनी न्यायालयात दाद मागावी, चंद्रकात पाटील यांचं टीकास्त्र
Chandrakant Patil : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली तर त्याबाबत आपल्यासारख्या एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त करावे असे काही नाही
Chandrakant Patil : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली तर त्याबाबत आपल्यासारख्या एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त करावे असे काही नाही. राऊत यांनी याबाबतीत भाजपावर केलेले आरोप निरर्थक आहेत. कारवाई मान्य नसेल तर राऊत यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यांनी एका पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही, असे पत्रकारांना सांगून उपयोग नाही. त्यांचा काही दोष नसेल तर त्यांनी न घाबरता न्यायालयाकडे जावे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांना कारवाईच्या धमक्या दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आमच्यापैकी कोणी चूक केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करा, पण उगाच धमक्या देण्याचे कारण नाही.
घाबरविण्याच्या ऐवजी सावध केल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी दुवाच दिला -
मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा इशारा वेळीच देऊन घाबरविण्याच्या ऐवजी सावध केल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी आपल्याला दुवा दिला, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी शहरातील मतदारांची माहिती गोळा करताना बँक खात्यांचीही माहिती मागत असल्याने आपण या प्रकाराची चौकशी केली. मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये मतदानाच्या वेळी पेटीएमसारख्या ॲपद्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न असल्याचेही ध्यानात आले. अशा प्रकारे काळा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविणे हे मनी लाँडरिंग असून त्यामुळे संपूर्ण प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, त्यामुळे मतदारांनी सावध रहावे, त्यांची काही चूक नसताना ते चौकशीत अडकू शकतात असे आपण सावध केले. लोकांनी अजाणतेपणाने बँकेच्या खात्यांची माहिती दिली होती. पण आपण संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराबाबत सावध वेळीच केल्याबद्दल आपल्याला अनेक नागरिकांनी दुवा दिला. आपला प्रयत्न लोकांना घाबरविण्याचा नव्हे तर सावध करण्याचा होता व ते लोकांना आवडले. आपण मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.