Chandani Chowk Flyover : अखेर मुहूर्त ठरला! चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन कधी होणार?
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 25 जुलैला य़ा पुलाचं उद्घाटन होणार आहे. पुलासंदर्भातील उर्वरित कामे मुदतीच्या आत पूर्ण करा, अशा सूचना मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.

Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 25 जुलैला या पुलाचं उद्घाटन होणार आहे. पुलासंदर्भातील उर्वरित कामे मुदतीच्या आत पूर्ण करा, अशा सूचना मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. चांदणी चौकातील संपूर्ण काम पूर्ण करण्याची अधिकृत मुदत महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र तोपर्यंत केवळ 80 टक्केच काम पूर्ण झालं होतं. गेल्या 20 दिवसांतील कामाचा वेग पाहता आता 25 जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे अधिकारी सांगत आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चांदणी चौकात 397 कोटी रुपये खर्चून 17 किमीचा रस्ता बांधला आहे. यामध्ये रॅम्प, सर्व्हिस रोड, अंडरपास यासारख्या रस्त्यांचा समावेश आहे. चांदणी चौकातील एकूण कामांपैकी 90 टक्के काम आता पूर्ण झाले आहे. आता फक्त मुख्य पूल शिल्लक आहे. बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल 150 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद असेल कारण पूर्वीचा पूल केवळ 50 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद होता. जुन्या पुलाचा पिलर अगदी रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. नवीन पुलासाठी बांधण्यात आलेले खांब रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणार असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही, हे संपूर्ण काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 मेपासून गर्डर टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार असून चांदणी चौकातील सर्व मुख्य कामे 25 जुलैपर्यंत पूर्ण होतील, असं NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
एक रॅम्प वाहतुकीसाठी सुरु
मुळशी आणि बावधनकडून साताऱ्याच्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. या मार्गासाठी तयार करण्यात आलेला रॅम्प सुरु करण्यात आला आहे. बहुतांश रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. अनेकांनी या नव्या रॅम्पवरुन प्रवासही केला आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
