दीक्षाभूमीवर पार पडला 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा
दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणि इथे येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. ती जमीन सरकारने उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव विलास गजघाटे यांनी केली.
नागपूर : 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचा मुख्य सोहळा आज संध्याकाळी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पार पडला. या प्रसंगी थायलंडचे बौद्ध महाउपासक डॉ. परमहा अनेक आणि म्यानमारचे बौद्ध महाउपासक टेंग ग्यार हे उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या सोहळ्याच्या सुरुवातीला भीम गीते सादर करण्यात आली. त्यानंतर बौद्ध भंते यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला आम्ही कधीच राजकीय आखाडा बनू दिला नाही आणि भविष्यातही दीक्षाभूमीवर कुठल्याही राजकीय विचारला थारा देणार नाही, अशी ग्वाही आम्ही सर्व भीम बांधवाना देत असल्याचं मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव विलास गजघाटे यांनी दिली.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणि इथे येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. ती जमीन सरकारने उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही गजघाटे यांनी केली. या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी दीक्षाभूमीच्या भव्य स्तुपाला निळ्या रोषणाईने सजवण्यात आलं होतं. सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने एकही राजकीय नेता या सोहळ्यात उपस्थित नव्हता.