Maratha Reservation Judgement | हायकोर्टात मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर राज्यभर मराठा बांधवांकडून जल्लोष
अहमदनगर कोपर्डी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी देखील कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आरक्षण दिल्याने त्यांचे आभार देखील मानले.
मुंबई : मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवांनी जल्लोष साजरा केला. सोलापुरात ढोल-ताशांच्या गजरात कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. शिवाजी चौक परिसरात मराठा समाजातील बांधवांनी जल्लोष केला.
औरंगाबादेतल्या क्रांती चौकातही मराठा समाजातील बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला.
कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. शहरातील मराठा बांधवांनी कोर्टाच्या निर्णयानंतर पेढे वाटपही केले. तिकडे नागपुरातही मराठा समाजातील बांधवांनी गुलाल उधळून, फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं.
ठाण्यात मराठा बांधवांनी तलावपाळी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जल्लोष केला. फटाके फोडले आणि लाडू देखील वाटले. जालन्यातही मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला. यावेळी हलगीच्या तालावर नाचून मराठा तरुणांनी आपला आनंद व्यक्त केला. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती आणि मराठा समाज बांधवांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत गुलालाची उधळण केली.
अहमदनगर कोपर्डी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी देखील कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आरक्षण दिल्याने त्यांचे आभार देखील मानले. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळायला हवे होते, मात्र 3 टक्के कमी मिळाले असले तरी ते महत्वाचे असल्याची असल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिली. मात्र ज्या प्रमाणे मराठा आरक्षण दिले त्याप्रमाणे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सरकारने मिटवला पाहिजे अशी मागणी देखील पीडित मुलीच्या आईने केली.