Farmers Day : राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होणार, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचं स्मरण
Farmers Day : पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील (padmashri dr vitthalrao vikhe-patil) यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे.
Farmers Day : पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील (padmashri dr vitthalrao vikhe-patil) यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. याबाबत शासनाने एक जीआर जारी केला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून 30 ऑगस्ट, 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन (Farmers Day) म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक
डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव होतं. सहकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्यातडे बघितलं जायचं. डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या तुकडे बंदी आणि तुकडे जोड विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विखे पाटलांनी प्रवरानगरचा साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्त्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला. विखे पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
सहकार या तत्त्वाच्या क्षमता लक्षात घेऊन, विठ्ठलरावांनी हे तत्त्व आचरणात आणले. शेतकर्यांपर्यंत हे तत्त्व नेऊन; अनेक संस्था स्थापन करून सहकाराचा परिचय त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला सुरुवातीच्या काळात करून दिला. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी-बुद्रुक या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. याच गावी त्यांनी 1923 मध्ये 'लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी' स्थापन केली. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेली ही आशियातील पहिलीच पतपेढी मानली जाते. यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
प्रवरानगरमध्ये आशियातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना
1929 मध्ये त्यांनी राजुरी या गावी आदिवासी समाजासाठी सहकारी सोसायटीची स्थापना केली. गोदावरी-प्रवरा कॅनॉल खरेदी-विक्रि संघाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. 1944 मध्ये त्यांनी सहकारी तत्त्वावरील शेतीसंस्थाही स्थापन केली. 17 जून, 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर (लोणी) येथे आशियातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना विखे-पाटील यांच्याच नेतृत्वाखाली उभा राहिला. या कारखान्यासाठी शेतकर्यांपर्यंत पोहोचून त्यांना सहकारी तत्त्वावरील कारखान्याचे महत्त्व पटवून देणे, शेतकर्यांकडूनच कारखान्याच्या भागभांडवलाची उभारणी करण्याचा प्रयत्न करणे, कारखान्याच्या मंजुरीसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे, इतर कार्यकर्त्यांवर सोपवलेल्या कामांचा पाठपुरावा करणे आदी कामांमध्ये विठ्ठलरावांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. कारखान्याच्या स्थापनेत त्यांना अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार्य लाभले. या कारखान्याचे पहिले अध्यक्ष गाडगीळ हेच होते.
शैक्षणिक क्षेत्रातही विखे पाटलांचं मोठं काम
समाजातील शेवटच्या स्तरावरील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठीही त्यांनी कार्य केले. अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांची स्थापना त्यांनी पुढाकार घेऊन केली. तसेच त्यांनी या शाळांना आर्थिक सहकार्यही केले. शैक्षणिक कार्यात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना यथाशक्ति साथ दिली.
महत्त्वाच्या बातम्या: