बुलढाण्यात 500 रुपयांसाठी प्रसुती झालेल्या महिलेची अडवणूक, बाळ देण्यास नकार; व्हिडीओ व्हायरल
बुलढाण्यातील चिखली ग्रामीण रुग्णालयात केवळ 500 रुपयांसाठी नवजात बाळ आईकडे देण्यासाठी अडवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर आणखी एका घटनेत प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईनेच केली. तरीही रुग्णालयाने तिच्याकडून पैसे उकळले.
बुलढाणा : सरकारी रुग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामीण रुग्णालयातही असाच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडला आहे. कामचुकारपणाचा कळस आणि पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रुपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक केल्याची घटना 19 डिसेंबरच्या रात्री घडली. तर 21 डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पार्वती सुरडकर या महिलेने आपल्या गरोदर मुलीला 19 डिसेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरु झाल्याने रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी 1200 रुपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईंनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मोलमजुरीने उदरनिर्वाह करणाऱ्या पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते. त्यात रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. मात्र, लालसेची परिसीमा गाठलेल्या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रुपये द्या तेव्हाच बाळ दिलं जाईल, असं सांगत अडवणूक करण्यात आली. याबाबत पार्वतीबाईंनी लेखी तक्रार देखील केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात सवणा येथील शेख समीर शेख सत्तार यांनी 21 डिसेंबरच्या रात्री आपल्या बहिणीला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. या महिलेला दहाच्या सुमारास प्रसुतीवेदना सुरु झाल्याने महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयात कार्यरत परिचारकांना याबाबत माहिती देऊन रुग्णाला पाहण्याची विनंती केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी प्रसुती होईल असे सांगून रुग्णाकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान गरोदर महिलेला त्रास वाढल्यानंतर पुन्हा माहिती दिली असता बुलडाणा येथे पाठवण्याची धमकी दिली. तिसऱ्यांदा विनंती केल्यानंतरही महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णाकडे पाहण्याचे टाळले. नाईलाजाने महिलेच्या तीव्र प्रसुती वेदना पाहता तिच्या आईनेच स्वत: तिची प्रसुती सुकर केली. रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष तर केलेच शिवाय कुटुंबियाकडून 500 रुपयेही घेतले. याखेरीज साफसफाई करणाऱ्या महिलेने 200 तर रक्त-लघवी तपासणीसाठी वेगळे 300 रुपये घेतल्याचा आरोप शेख समीर यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे.
केवळ पाचशे रुपयांसाठी बाळ देण्यास टाळल्याची तक्रार करणाऱ्या पार्वतीबाई सुरडकर यांच्या तक्रारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.