एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, पण पदासाठी हात पसरण्याचे संस्कार रक्तात नाही; पंकजा मुंडेंची खदखद
भाजप नेत्या पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
बुलढाणा : एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, लोकांच्या दहा परिक्रमा करेन. पण कुठल्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा एकदा समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
दुसरबीड येथे शनिवारी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात, तुम्हाला दहा परिक्रमा मी करेन. अजून कुठल्या परिक्रमेची मला गरज नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर, त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन. पण कुणासमोर हात पसरून कोणत्या पदाची मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तरी चालेल, पण लोकांच्या सेवेची संधी मी सोडणार नाही."
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची संधी दिली आहे. खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. पण प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यावर मुंडे समर्थक नाराज झाले होते. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली. त्यावेळीही पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या :
- Parli Election: परळी नगरपालिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकू- पंकजा मुंडे
- Dasara Melava 2021 : वेळ आलीच तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन : पंकजा मुंडे
- राष्ट्रीय महामार्गाला काम पूर्ण होण्याआधीच भेगा, पंकजा मुंडेंचं ट्वीट, गडकरींकडून कारवाईचे निर्देश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha