Pune Rain News: कामशेतजवळील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली; आठ गावांचा संपर्क तुटला
पुण्यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल यावर्षी पुन्हा पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
Pune Rain News: पुण्यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल यावर्षी पुन्हा पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांसाठी वाहतुकीचा एकच मार्ग असल्याने आता प्रशासन आणि राजकीय नेते लक्ष देणार का? असा प्रश्न संबंधित ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
वाडीवळे, वलक, बुधवाडी, सांगिसे, वाढवली, नेसावे, खांडशी, उंबरवाडी या आठ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुलावरून पाणी वाहत असतानाही काही दुग्ध व्यवसायी, कामकरी, शाळकरी मुले दररोज हा जीवघेणा प्रवास करताना दिसतात. मावळात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असून, प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याबद्दल ग्रामस्थ संतापले आहेत.
पाटबंधारे विभागाने यापूर्वीच पावसाळ्यात पूरग्रस्त भागातील पुलांचे सर्वेक्षण करून चाचणी केली असती, तर उपाययोजना करणे शक्य झाले असते. अंदर मावळातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तर पवन मावळातील तुंग गावाजवळील पूल पाण्याखाली जाणार आहे. निवडणुकीच्या काळात गावोगावी जाणारे नेते केवळ मतांसाठी येतात आणि अडचणीच्या काळात कोणीही दिसत नाही, अशी व्यथा आणि संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
कामशेत परिसरात अनेक ठिकाणी दरवर्षी जोरदार पाऊस होतो. या पावसापासून सुरक्षेसाठी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदा पुणे जिल्ह्यात 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गेले तीन दिवस जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात अनेकांचं नुकसान होत आहे. कामशेत परिसरात शेती जास्त प्रमाणात आहे. 28 टक्के क्षेत्रात पुणे जिल्ह्यात पेरणी झाली आहे. काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. शेतातसुद्धा पाणी शिरले आहे.
लोणावळ्यात देखील अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस झाल्याने आणि भुशी धरणाने रौद्र रुप धारण केल्याने पर्यटकांना पाच नंतर बंदी घालण्यात आली आहे. गेले तीन दिवस मुसळधार पावसामुळे भुशी धरणाने रौद्र रुप धारण केल्याने बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.