Breaking News LIVE : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार
Breaking News LIVE Updates, 20 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बर्निंग कारचा थरार अनेकांनी अनुभवला. यात एक अलिशान कार जळून खाक झाली. दुपारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना कामशेत बोगद्याजवळ ही गाडी आली. यात एक कुटुंब प्रवास करत होतं, तेंव्हाच कारमधून धूर येत असल्याचे दिसले. तातडीने चालकाने गाडी बाजूला घेतली अन ते कुटुंब गाडीतून खाली उतरले. नंतर गाडीने पेट घेतला, याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं पण आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत कार जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात देखील एका अलिशन गाडीला आग लागली होती. सुदैवाने ही घटना उर्से टोल नाक्यावर घडली आणि तिथंच यंत्रणा उपलब्ध असल्याने काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.
दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार आहात की, आम्ही निर्णय रद्द करु? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला थेट विचारला आहे. परीक्षाच न घेणं हा निर्णय महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाबाबत कसा काय घेतला जाऊ शकतो? असाही प्रश्न हायकोर्टानं विचारला आहे. दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली.
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कल्याण स्टेशनवर अँटिजन टेस्ट बंधनकारक, अँटिजन न करणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई, केडीएमसी आयुक्तांचे निर्देश
मुंबई : भायखळ्याची ओळख असणारी दगडी चाळ आता दगडी टॉवर होणार आहे. कारण दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला आहे. दगडी चाळीत दहा इमारती उपकर प्राप्त आहेत. चाळीने इमारतीच्या पुनर्विकासासाठीची परवानगी म्हाडाकडे मागितली होती. याबाबतचा प्रस्ताव दगडी चाळीतील भाडेकरू जानेवारी महिन्यात म्हाडाकडे घेऊन आले होते. तो प्रस्ताव आता म्हाडाने स्वीकारला आहे. आता तो प्रस्ताव वॉर्डकडे जाईल आणि त्यानंतर भाडेकरूंची पात्रता निश्चित करून पुढे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दगडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. सध्या दगडी चाळीमध्ये दहा इमारती असून यातील आठ इमारती अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मालकीच्या आहेत. इतर दोन इमारती देखील लवकरच अरुण गवळी यांच्या मालकीच्या होणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये दगडी चाळीतील या इमारतीमध्ये राहणारे भाडेकरू म्हाडाकडे इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्ताव घेऊन आले होते. या प्रस्तावाला आता म्हाडाने मंजुरी दिली असल्याची माहिती म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. पुढील बारा महिन्यांमध्ये दगडी चाळीतील रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकासाच्या प्रस्तावाची मंजुरी आणायचे आहे. ही मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच म्हाडाकडून दगडी चाळीच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखील विनोद घोसाळकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.
चंद्रपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) निर्देशा प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील वाघ आणि इतर प्राण्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. ताडोबाचे क्षेत्र निदेशक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची माहिती. मानव आणि वन्यप्राणी यांचा संपर्क येऊ नये यासाठी पर्यटना संबंधी सर्वबाबी आधीच बंद करण्यात आल्या आहेत. ताडोबाच्या वन्य प्राण्यांच्या वर्तणूकीत काही बदल झालाय का? आणि वन्यप्राणी आजारी आहे का यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नजर ठेवली जाणार आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसीसचे 10 रुग्णांची नोंद आहे. खाजगी रुग्णालयात जवळपास 200 च्या वरती रुग्ण आहेत. यामधून एका खाजगी रुग्णालयात एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण त्याची सरकारी नोंद अद्यापही घेतली गेली नाही.
राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून त्यांच्या उपचारासाठी अॅम्फोटेरिसिन- बी इंजेक्शन आवश्यक आहे. मात्र, या औषधाचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे थेट आरोग्य विभागामार्फत हे औषध खरेदी करून सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहे. यासाठी हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशनचे मॅनेजर डॉ. विजय बाविस्कर यांनी भारत सीरम अँड व्हॅक्सिनकडे 75 हजार इंजेक्शनच्या व्हायल्सची मागणी नोंदवली, तर एक हजार अॅम्फोटेरिसन इंजेक्शन प्राप्त झाले असून याचे वितरणही सुरू झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे
विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर हिंदू देवदेवतांविषयी ट्विटरवर द्वेष निर्माण करणारी वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 मे रोजी उस्मानी ने ट्विटरवर रामाच्या नावाचा वापर करत तिरस्कार आणि द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत हिंदू जनजागरण मंच संघटनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या 295A आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्रीवादळात झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही असाही आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा राज्यांमधी 54 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. त्यामध्ये राज्यातील अहमदनगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, बीड, परभणी, सांगली, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर या 17 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
बार्ज P-305 दुर्घटनेत 37 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. INS कोचीनंतर INS कोलकाता ही युद्धनौक मुंबईच्या बंदरावर पोहोचली आहे. बार्ज P-305 दुर्घटनेतील वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना परत आणलं आहे. शिवाय अनेक मृतदेह देखील आणण्यात आले आहेत. अधिकृतरित्या 37 मृतदेह हाती सापडले आहेत. तर 38 कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. बार्ज P-305 वर एकूण 261 कर्मचारी होते. त्यापैकी 186 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. (नौदलाने 188 जणांना वाचवण्याचं सांगितलं आहे, त्यापैकी 2 जण एका टग बोटी दुर्घटनेतील कर्मचारी होते) 75 कर्मचारी बेपत्ता होते. त्यापैकी 37 मृतदेह किनाऱ्यावर आणले आहेत. त्यामधील चार मृतदेह रात्री यलो गेट पोलीस स्टेशनला सोपवण्यात आले. यलो गेट पोलिसांकडून ADR दाखल केला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे अशी टीका खासदार संभाजीराजेंनी केली आहे. मी संमज्यस्याची भूमिका घेतो, काही लोक टीम टीम करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. 27 तारखेला आपण मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांशी भेट घेणार, समाजाची भूमिका मांडणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.
चक्रीवादळ पार्श्वभूमीवर उपनगरात झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरावर झाड पडून नुकसान झाले आहेत. एकीकडे कोरोनामुळे अनेक नागरिकांचे नोकरी गेल्यामुळे संकट आले या सर्व नागरिकांना आर्थिक अडचण आहे. विविध भागात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मदत केली असून त्या सर्व घराचे पंचनामे करण्यात यावे असे आदेश देखील आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण सापडले असून यामध्ये 9 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी सीपीआर रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.
रायगड : जिल्ह्यातही म्युकर मायकोसिसचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 रुग्ण आढळले आहेत. पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि खोपोली येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तिघांवरही पनवेल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असणारी औषधे शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.
सिंधुदुर्ग : तळकोकणात सलग सहाव्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर भला मोठा वृक्ष कोसळला आहे. ग्रामीण भागातही रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. तर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.
नांदेड : नांदेड येथील गोदावरी रुग्णालयात पैसे उकळण्यासाठी मृत रुग्णावर चक्क तीन दिवस उपचार सुरु होते. नांदेड न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
झाड पडून मृ्त पावलेल्या संगीता खरात यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च युवासेना सचिव वरूण सरदेसाईनी उचलला आहे. घरकाम करून मुलांना शिक्षण देणा-या संगीता खरात यांच्या अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू झाला होता त्यांच्या पश्चात असणा-या त्यांच्या दोन मुलांची कहाणी एबीपी माझानं दाखवली होती. त्यानंतर अनेक संस्था पुढे आल्या आहेत. अनेक लोकांना खरात कुटुंबियांना आर्थिक मदत करायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर युवासेनेनं शिक्षणाचा खर्च उचलल्यानं खरात कुटुंबियांचा अर्धा भार हलका झाला आहे.
सांगलीतील जतमध्ये कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी लोकप्रतिनिधींचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगीच कोविड सेंटर कोणी सुरु केले, यावरुन राजकारण करत जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांमध्ये वादावादी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी हात जोडून विनंती केल्यानंतरही लोकप्रतिनिधींनी वाद सुरुच ठेवला. जतपासून सांगलीचे अंतर जास्त असल्याने कालपासून जतमध्ये 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्या आले. यावेळी लोकप्रतिनिधींमध्ये वादावादी झाली.
मुंबईत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरद्वारे सरकारला लसीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. "मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दी?" असा प्रश्न विचारणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. असेच बॅनर्स काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत लावले होते. यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक देखील केली होती.
अमरावती : जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकच लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लसीकरण केंद्र सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. पण सकाळ 4 वाजल्यापासून जेष्ठांच्या मोठ्या रांगा लसीकरण केंद्राबाहेर दिसून येत आहेत. चौथ्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे सुरु होणार आहे. अमरावती जिल्ह्यात लसीचे 7 हजार 600 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्ड 4 हजार 600 आणि कोवॅक्सिन 3 हजार अशी एकूण 7 हजार 600 लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी लसीकरणाची एक मात्रा घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीत आलेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. याची दखल औरंगाबाद न्यायालयाने घेतली आहे. घाटीत किती व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत? याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. व्हेंटिलेटर प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचे नेमके वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी खंडपीठाने पुढाकार घेतला आहे. नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरस्तीची प्रक्रिया, तज्ज्ञांचे याबाबत मतही मागवले. तसेच शासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांच्याकडून खंडपीठ कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना प्राप्त व्हॅटिलेटर्ससंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत बुधवारी हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. एरव्ही इतर प्रकरणांत वकिलांची फौज उभी करता?, मात्र विद्यार्थ्यांसाठी कुणीही जेष्ठ वकील का येत नाही? या प्रकरणातली गंभीरता ओळखा, या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला इशारा दिला आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी रात्री साडेआठ वाजता सुनावणी झाली.
पार्श्वभूमी
कोरोना आलेख उतरणीला...! बुधवारी राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.06% एवढे झाले आहे.
राज्यात काल 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी मिळणार खतं, प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारनं घेतला निर्णय
लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं होतं. तसेच राजू शेट्टी यांनी देखील याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
गौडा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की, आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये वाढ झाली आहे तरीही देखील शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळतील, असं त्यांनी म्हटलं आहे. DAP खतांवर सबसीडी 140% वाढवली आहे. शेतकऱ्यांना DAP वर 500 रुपये प्रत्येक गोणीवरुन आता 1200 रुपये प्रती गोणी सबसिडी मिळेल. शेतकऱ्यांना DAPची एक बैग 2400 रुपयाऐवजी 1200 रुपयांना मिळेल, असं गौडा यांनी सांगितलं आहे.
SSC Exam : राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही : हायकोर्ट
विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत बुधवारी हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. एरव्ही इतर प्रकरणांत वकिलांची फौज उभी करता?, मात्र विद्यार्थ्यांसाठी कुणीही जेष्ठ वकील का येत नाही? या प्रकरणातली गंभीरता ओळखा, या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला इशारा दिला आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी रात्री साडेआठ वाजता सुनावणी झाली.
दहावीच्या परीक्षा रद्द करणं, हा शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातील इतका महत्त्वाचा विषय असताना महाधिवक्ता का हजर झाले नाहीत?, असा सवालही हायकोर्टानं यावेळी विचारला. दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे की नाही?, असा सवाल करत गुरूवारी हायकोर्टात होणा-या सुनावणीत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -