Breaking News LIVE : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार
Breaking News LIVE Updates, 20 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
कोरोना आलेख उतरणीला...! बुधवारी राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.06% एवढे झाले आहे.
राज्यात काल 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी मिळणार खतं, प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारनं घेतला निर्णय
लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं होतं. तसेच राजू शेट्टी यांनी देखील याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
गौडा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की, आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये वाढ झाली आहे तरीही देखील शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळतील, असं त्यांनी म्हटलं आहे. DAP खतांवर सबसीडी 140% वाढवली आहे. शेतकऱ्यांना DAP वर 500 रुपये प्रत्येक गोणीवरुन आता 1200 रुपये प्रती गोणी सबसिडी मिळेल. शेतकऱ्यांना DAPची एक बैग 2400 रुपयाऐवजी 1200 रुपयांना मिळेल, असं गौडा यांनी सांगितलं आहे.
SSC Exam : राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही : हायकोर्ट
विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत बुधवारी हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. एरव्ही इतर प्रकरणांत वकिलांची फौज उभी करता?, मात्र विद्यार्थ्यांसाठी कुणीही जेष्ठ वकील का येत नाही? या प्रकरणातली गंभीरता ओळखा, या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला इशारा दिला आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी रात्री साडेआठ वाजता सुनावणी झाली.
दहावीच्या परीक्षा रद्द करणं, हा शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातील इतका महत्त्वाचा विषय असताना महाधिवक्ता का हजर झाले नाहीत?, असा सवालही हायकोर्टानं यावेळी विचारला. दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे की नाही?, असा सवाल करत गुरूवारी हायकोर्टात होणा-या सुनावणीत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बर्निंग कारचा थरार अनेकांनी अनुभवला. यात एक अलिशान कार जळून खाक झाली. दुपारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना कामशेत बोगद्याजवळ ही गाडी आली. यात एक कुटुंब प्रवास करत होतं, तेंव्हाच कारमधून धूर येत असल्याचे दिसले. तातडीने चालकाने गाडी बाजूला घेतली अन ते कुटुंब गाडीतून खाली उतरले. नंतर गाडीने पेट घेतला, याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं पण आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत कार जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात देखील एका अलिशन गाडीला आग लागली होती. सुदैवाने ही घटना उर्से टोल नाक्यावर घडली आणि तिथंच यंत्रणा उपलब्ध असल्याने काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.
Mumbai Corona Cases : आज मुंबईत 1425 नवे रुग्ण तर 1460 जणांना डिस्चार्ज, 59 जणांच्या मृत्यूंची नोंद
परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार आहात की, आम्ही निर्णय रद्द करु?, हायकोर्टाचा सरकारला सवाल
दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार आहात की, आम्ही निर्णय रद्द करु? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला थेट विचारला आहे. परीक्षाच न घेणं हा निर्णय महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाबाबत कसा काय घेतला जाऊ शकतो? असाही प्रश्न हायकोर्टानं विचारला आहे. दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली.
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कल्याण स्टेशनवर अँटिजन टेस्ट बंधनकारक
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कल्याण स्टेशनवर अँटिजन टेस्ट बंधनकारक, अँटिजन न करणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई, केडीएमसी आयुक्तांचे निर्देश
मुंबई : भायखळ्याची ओळख असणारी दगडी चाळ आता दगडी टॉवर होणार, पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला
मुंबई : भायखळ्याची ओळख असणारी दगडी चाळ आता दगडी टॉवर होणार आहे. कारण दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला आहे. दगडी चाळीत दहा इमारती उपकर प्राप्त आहेत. चाळीने इमारतीच्या पुनर्विकासासाठीची परवानगी म्हाडाकडे मागितली होती. याबाबतचा प्रस्ताव दगडी चाळीतील भाडेकरू जानेवारी महिन्यात म्हाडाकडे घेऊन आले होते. तो प्रस्ताव आता म्हाडाने स्वीकारला आहे. आता तो प्रस्ताव वॉर्डकडे जाईल आणि त्यानंतर भाडेकरूंची पात्रता निश्चित करून पुढे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दगडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. सध्या दगडी चाळीमध्ये दहा इमारती असून यातील आठ इमारती अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मालकीच्या आहेत. इतर दोन इमारती देखील लवकरच अरुण गवळी यांच्या मालकीच्या होणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये दगडी चाळीतील या इमारतीमध्ये राहणारे भाडेकरू म्हाडाकडे इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्ताव घेऊन आले होते. या प्रस्तावाला आता म्हाडाने मंजुरी दिली असल्याची माहिती म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. पुढील बारा महिन्यांमध्ये दगडी चाळीतील रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकासाच्या प्रस्तावाची मंजुरी आणायचे आहे. ही मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच म्हाडाकडून दगडी चाळीच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखील विनोद घोसाळकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.